ठळक मुद्देप्रशिक्षक म्हणून काम करणं ही जबाबदारीच नाही तर माझ्यासाठी एक पुर्णतर् नवीन संधी होती.
मेघना ढोके
रणजी स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचं रेकॉर्ड ज्याच्या नावावर आहे, त्याच वसीम जाफरने युवा बांग्लादेशी क्रिकेटपटूंना असे काही बॅटिंगचे धडे दिले की, त्यांनी तगडय़ा भारतीय संघाला नमवत बांग्लादेशला पहिलावहिला विश्वचषक जिंकून दिला. बांग्लादेशच्या 19 वर्षाखालील या युवा संघाचा वसीम जाफर बॅटिंग प्रशिक्षक होता. आधी मुंबई आणि नंतर विदर्भ रणजी संघाकडून खेळताना सर्वाधिक 150 रणजी सामने खेळण्याचा, दहावेळा रणजीविजेत्या संघाचा सदस्य असण्याचा गौरवही त्याच्या नावावर आहे. विदर्भ संघानं पहिल्यांदा रणजीचं विजेतेपद जिंकलं, त्यातही जाफरचा वाटा मोठा होता. यावेळी बांग्लादेशी मुलांना शिकवून त्यानं कमाल केली, त्यानिमित्त वसीम जाफरशी ही खास बातचित.
मिरपूरमध्ये पहिल्यांदा बांग्लादेशी तरुण खेळाडूंना तू भेटलास, ती भेट आठवतेय अजून?
बांग्लादेश क्रिकेट बोर्डानं मिरपूरला एक हायफरफॉर्मन्स अकॅडमी सुरु केली आहे. त्यांच्यासाठी मी फक्त बॅटिंग करणार्या मुलांसह काम करत होतो. त्या मुलांना मी एकच सांगितलं, क्रिकेट खेळायचं तर टेकिAक आणि टेम्परामेण्ट या दोन गोष्टी महत्वाच्या. मला भेटण्यापूर्वी साधारण एक ते दीड वर्षे ही मुलं एकत्र होती, बीसीबीचं श्रेय असं की त्यांनी याला काढ, त्याला बदल असं न करता या मुलांना एकत्र ठेवलं, खेळू दिलं. त्यामुळे त्यांचा एकमेकांशी संवाद उत्तम होता, टीम उत्तम बांधली जात होती. त्यामुळे इतक्या अटीतटीच्या सामन्यातही त्या मुलांनी उत्तम खेळ केला.
अण्डर 19 का होईना पण आंतरराष्ट्रीय स्तरावर थेट वर्ल्डकपर्पयत पोहोचलेला हा पहिलाच बांग्लादेशी संघ, या तरुण मुलांविषयी काय सांगशील, त्यांचं मुळात टेम्परामेण्ट कसं होतं?
तिथं गेल्यावरच माझ्या लक्षात आलं, की मुलं कमालीची मेहनती आहेत. अतिशय साधी मुलं. अनेकजणांच्या घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम. क्रिकेट ही त्यांच्यासाठी एक संधी आहे हे स्पष्ट दिसत होतंच. त्यांच्या डोळ्यातच जिद्द होती, आणि त्याला मेहनतीची जोड. त्यांना माहिती होतं की, आपण उत्तम क्रिकेट खेळलो तर आपलं जगणंच पार बदलून जाईल आणि ती संधी या मुलांना सोडायची नव्हती त्यामुळे त्यापायी वाट्टेल तेवढी मेहनत करायला ती तयार होती. त्यांचं वैशिष्टय म्हणजे त्यांचं ‘वन ट्रॅक माइण्ड’. मला या काळात असं ‘वन ट्रॅक’ असणं फार महत्वाचं वाटतं. क्रिकेट खेळणं हे एकच आयुष्याचं ध्येय असल्यागत, डोक्यात ती एकमेव गोष्ट ठेवून ते शिकतही होते, खेळतही होते.
तुझीही ही ‘प्रशिक्षक’ म्हणून पहिलीच जबाबदारी होती?
हो, पहिल्यांदाच मी अशी काही औपचारिक जबाबदारी स्वीकारली होती. एरव्ही तुम्ही संघात असता, सहकार्यांशी बोलता, नव्या खेळाडूंना काही मदत करता, ते वेगळं. पण प्रशिक्षक म्हणून काम करणं ही जबाबदारीच नाही तर माझ्यासाठी एक पुर्णतर् नवीन संधी होती. एक मोठं आव्हान होतं. इतकी वर्षे मी जे शिकलो, ते कुणासोबत वाटून घेतलं, त्यातून त्यांचा खेळ बहरला, यापेक्षा मोठा आनंद तो काय? मला क्रिकेटनं हा वेगळा जबरदस्त आनंदही मिळवून दिला, त्यात ती मुलं जिंकली, भरुन पावलो!
Web Title: how Wasim Jaffer's batting magic worked in Bangladesh Under-19 World Cup victory!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.