इंडियन प्रीमिअर लीगचे १४वे पर्व स्थगित झाल्यानंतर सर्व खेळाडू आपापल्या घराकडे परतले आहेत. कोरोना व्हायरसनं बायो बबलचं कवच भेदल्यानंतर KKR, CSK, DC व SRHच्या संघातील सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. सध्या सर्व फ्रँचायझी त्यांच्या खेळाडूंना चार्टर्ड फ्लाईट्सनं घरात पाठवत आहेत. शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) मुख्य प्रशिक्षक मायकल हस्सी व गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी यांना एअरलिफ्ट करून चेन्नईत हलवले. ही दोघंही कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती आणि त्यांना चेन्नईला हलवल्यानंतर अन्य फ्रँचायझींनी आक्षेप नोंदवला आहे. कोरोना पॉझिटिव्ह असूनही CSKच्या दोन सदस्यांना कसे हलवण्यात आले, त्यांनी हे पाऊल उचलून इतरांनाही संकटात टाकले आहे, असा दावा अन्य फ्रँचायझींनी केला. IPL 2021मधून मिळालेला संपूर्ण पगार कोरोना लढ्यासाठी केला दान; KKRच्या माजी खेळाडूचं मोठं काम
बालाजी व हस्सी या दोघांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. बीसीसीआयच्या नियमानुसार कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तिला दहा दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये रहावे लागले आणि त्यांचा कोरोना रिपोर्ट दोन वेळा निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांचा क्वारंटाईन कालावधी संपेल. शिवाय दहाव्या दिवसानंतर त्यांच्यात कोरोनाची कोणतीच लक्षण दिसात कामा नये. ''CSKचा गोलंदाज प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी व अन्य सदस्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि त्यांना अन्य सहकाऱ्यांमधून वेगळं करताना विलगीकरणात ठेवले आहे. बीसीसीआय व CSKची वैद्यकिय टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे,''असे स्टेटमेंट CSKने जाहीर केले होते. त्यानंतर मायकल हस्सीचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
''कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तिंना त्यांच्या खोलीबाहेर कसे जाऊ दिले?, त्यांच्यामुळे अधिक लोकांना कोरोना होऊ शकतो. बीसीसीआयच्या नियमानुसार दहा दिवसांचा क्वारंटाईन आणि दोन निगेटिव्ह रिपोर्ट महत्त्वाचे होते. मग तरीही बालाजी व हस्सी यांना एअरलिफ्ट कसे केले गेले. हे बीसीसीआयच्या नियमांचाच नव्हे, तर सरकारच्या नियमांचं उल्लंघन आहे. आयपीएलमधील अव्वल फ्रँचायझी असे कसे वागू शकते?,''असा सवाल एका फ्रँचायझीनं केला आहे.
गुरुवारी बालाजी व हस्सी यांना नवी दिल्ली ते चेन्नई असे एअरलिफ्ट केले गेले. दोघांसाठी नियमानुसार विशेष एअर टॅक्सीची सोय केली होती. हस्सी विमानात बसला तेव्हा त्याची RTPCR चाचणी निगेटिव्ह आली होती, तर बालाजीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह होता, असे वृत्त दी हिंदूनं प्रसिद्ध केलं होतं.