मुंबई : भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी उद्या (शुक्रवारी) मुलाखती होणार आहेत. बीसीसीआयचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील प्रशिक्षकपदाच्या मुलाखती होणार आहे. पण या मुलाखतीसाठी विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री हे उपस्थित राहणार नाहीत, असे समजते आहे.
भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांना या या मुलाखतीसाठी भारतात यायला जमणार नाही, असे म्हटले जात आहे. त्यामुळे प्रशिक्षकपदाच्या मुलाखतीसाठी रवी शास्त्री उपस्थित राहणार का, हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. कारण फक्त एका दिवसासाठी शास्त्री यांना भारतात यायचे असेल तर त्यांना 2 दिवसांचा प्रवास करावा लागेल. त्याबरोबर त्यांना संघाला सोडावे लागेल. त्यामुळे शास्त्री मुलाखतीसाठी भारतात येऊ शकणार नाहीत, असे म्हटले जात आहे. पण मुलाखतीशिवाय कोणत्याही उमेदवाराची निवड होऊ शकत नाही, त्यामुळे शास्त्री आता करणार काय, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल.
शास्त्री यांना मुलाखतीसाठी भारतात यायला जमणार नाही, पण तरीही ते मुलाखत देणार आहे, असे समजते. शास्त्री हे स्काइपच्या माध्यमातून कपिल देव यांच्या समितीबरोबर संपर्कात येतील आणि या माध्यमातूनच त्यांची मुलाखत होईल, असे म्हटले जात आहे. शास्त्री यांच्यासह टॉम मूडी, माइक हेसन, फिर सिमॉन्स, लालचंद राजपूत आणि रॉबीन सिंग हे शर्यतीत आहेत.
या पदासाठी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू टॉम मूडी यांच्यासह न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन, वेस्ट इंडिजचे माजी सलामीवीर फिल सिमॉन्स, भारताचा माजी खेळाडू रॉबीन सिंग आणि भारताचे माज व्यवस्थापक आणि झिम्बाब्वे संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनी अर्ज केले आहेत. त्याशिवाय भारताचे माजी कसोटीपटू प्रविण आम्रे यांनी फलंदाजी प्रशिक्षक, तर दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जाँटी ऱ्होड्सने क्षेत्ररक्षक प्रशिक्षकपदासाठी अर्ज केले आहेत.
उमेदवारांपैकी सिमन्स यांच्याकडे आयर्लंड आणि अफगाणिस्तानच्या क्रिकेट प्रशिक्षक पदाचा चांगला अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनात दोन्ही संघांनी यश मिळवले. 2016 च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजला जेतेपद मिळवून देण्यात देखील सिमन्स यांचा मोठा वाटा आहे. हेसन हे न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक आहेत. तर टॉम मुडी हे श्रीलंकेचे प्रशिक्षक आहेत. भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्यासह माजी फलंदाज व प्रशिक्षक अंशुमन गायकवाड व महिला संघाची माजी कर्णधार शांता रंगास्वामी सल्लागार समितीचे सदस्य आहेत. सध्या रवी शास्त्री आणि त्यांच्या टीमला 45 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर नवीन प्रशिक्षक निवडला जाईल.
कोहलीला मुख्य प्रशिक्षक म्हणून शास्त्रीच हवे आहेत आणि हे त्यानं उघडपणे जाहीरही केले आहे. कोहली म्हणाला,'' रवी शास्त्रीच प्रशिक्षकपदी कायम राहिल्यास मला आणि संघाला आनंद होईल. क्रिकेट सल्लागार समितीनं याबाबत माझ्याकडे मत मागितलेले नाही आणि ही प्रक्रिया कशी पार पाडेल, हेही मला माहीत नाही. पण, सल्लागार समितीनं माझं मत विचारल्यास, मी त्यांच्याशी चर्चा करीन. शास्त्रींसोबत संघ चांगली कामगिरी करत आहे आणि आम्ही एकमेकांचा आदर करतो. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळायला आवडेल.''
Web Title: How will Ravi Shastri attend the interview for the post of coach? 'This' is the problem ...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.