नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकात भारताचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले. आयपीएलमधील कामगिरी पाहता विश्वचषक जिंकण्याची टीम इंडियाला पसंती मिळाली होती. मात्र, पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभवाचे तोंड पाहावे लागल्याने उपांत्य फेरीच्या आशा मावळल्या. आजी- माजी खेळाडूंनी संघाच्या पराभवाची कारणे सांगितली. माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भारताच्या निराशाजनक कामगिरीचे परखड शब्दांत विश्लेषण केले.
‘स्पोर्टस् तक’शी बोलताना ‘पॉवर प्ले’मध्ये भारतीय फलंदाजांनी धावा काढल्या नाहीत. यापेक्षा पराभवासाठी दुसरे कारण नाही, असे सांगून गावसकर म्हणाले, ‘केवळ या स्पर्धेत नव्हे, तर अनेक स्पर्धांमध्ये याच चुका घडल्या. पॉवर प्लेमध्ये दोन खेळाडू ३० यार्डच्या बाहेर उभे असतात. भारताने मागच्या काही आयसीसी स्पर्धांमध्ये पॉवर प्लेचा योग्य वापर केलेला नाही. त्यामुळे चांगली गोलंदाजी असलेल्या संघासमोर धावसंख्या उभारता येत नाही. यात बदल होणे गरजेचे आहे.’
पराभवानंतर अंतिम एकादशमध्ये अधिक बदल करू नये. संघात बदल केल्याचे आधीच नुकसान सोसावे लागले आहे. संघात खूप सारे बदल करणे चुकीचे आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघाविरुद्ध मोठी धावसंख्या उभारण्यास भारतीय खेळाडू अपयशी ठरले. आम्ही धावा काढल्या नाहीत, हेच सत्य आहे. न्यूझीलंडने ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केले, धावा रोखल्या आणि झेल घेतले, हे महत्त्वपूर्ण होते. पराभवासाठी भारताला दुसरे कुठलेही कारण देता येणार नाही, असे गावसकर यांनी म्हटले आहे.