India vs Australia, 4th Test Day 5 : इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, लोकेश राहुल, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, हनुमा विहारी ही दुखापतग्रस्त खेळाडूंची वाढती यादी पाहून टीम इंडियाचं काही खरं नाही, असाच अंदाज सर्वांना लावला होता. त्यात पहिल्या कसोटीतील मानहानिकारक पराभवानंतर कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) मायदेशात परतला. तेव्हाच ऑस्ट्रेलियाचे अनेक दिग्गज टीम इंडियाचा ४-० असा पराभव, हा निकाल लावून मोकळे झाले. पण, अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली युवा ब्रिगेडनं कांगारूंना सळो की पळो करून सोडलं. भारतानं मालिकेत फक्त कमबॅक केले नाही, तर २-१ असा विजय मिळवून दिला. यानंतर उद्योगपती आनंद महिंद्रा ( Anand Mahindra) यांनी खास ट्विट करून त्या ऑसी खेळाडूंना चिमटा काढला.
टीम इंडियानं अजिंक्यच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर इतिहास रचला. प्रमुख खेळाडू जायबंदी होत असताना अजिंक्यनं मोठ्या कौशल्यानं सहकाऱ्यांना सोबत घेऊन एकजुटीनं कांगारूंचा सामना केला आणि इतिहास घडवला. शुबमन गिल ( Shubman Gill), रिषभ पंत ( Rishabh Pant) आणि चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) यांनी शानदार खेळ केला. ऑस्ट्रेलियानं ठेवलेले ३२८ धावांचे लक्ष्य टीम इंडियानं ३ विकेट्स राखून पार केले. शुबमन गिलने १४६ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ९१ धावा केल्या. पुजारानं २११ चेंडूंचा सामना करताना ५६ धावा केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणे २२ चेंडूंत २४ धावांत माघारी परतला. रिषभनं आक्रमक खेळ करताना १३८ चेंडूंत ९ चौकार व १ षटकार खेचून नाबाद ८९ धावा चोपल्या.
या विजयानंतर आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलं. त्यांनी ऑस्ट्रेलियन दिग्गजांच्या कमेंटचा फोटो पोस्ट करून त्यावर लिहिले की,''तुम्हाला तुमची वाक्य कशी खायला आवडतील?, शेकून, तळून, भाजून.... चपातीसह किंवा डोसासह?'' हा चिमटा मायकेल क्लार्क, रिकी पॉंटिंग, मार्क वॉ, ब्रॅड हॅडिन या ऑस्ट्रेलियन खेळाडूंसह मायकेल वॉन या इंग्लंडच्या माजी खेळाडूना होता.