T20 World Cup 2024 - बांगलादेशला सोमवारी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेकडून फक्त चार धावांनी पराभव झाला. आफ्रिकेच्या ६ बाद ११३ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला ७ बाद १०९ धावाच करता आला. पण, सामन्यामध्ये अम्पायरचा एक निर्णय ज्याने बांगलादेशचा विजय हिरावून घेतला आणि त्यामुळे वादाला सुरुवात झाली आहे. १७व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर महमुदुल्लाला पंचांनी LBW आऊट दिले. दरम्यान चेंडू सीमारेषेपर्यंत गेला आणि त्याला रोखण्यासाठी कोणीही खेळाडू धावला नाही. महमुदुल्लाहने DRS घेतला आणि अम्पायरला निर्णय बदलावा लागला, मात्र बांगलादेशला एकही धाव मिळाली नाही.
ICC च्या नियमामुळे बांगलादेशला त्या चार धावा मिळाल्या नाही आणि त्याच शेवटी निर्णायक ठरल्या. भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर बांगलादेशच्या समर्थनार्थ उतरला. महमुदुल्लाला चुकीच्या पद्धतीने LBW आऊट करण्यात आले, चेंडू लेग बाय चौकार गेला. DRSवर निर्णय उलटला. बांग्लादेशला ४ धावा मिळाल्या नाहीत कारण बॅटर आऊट केल्यावर बॉल डेड झाला आहे, भलेही मग तो निर्णय चुकीचा असला तरी. आफ्रिका ४ धावांनी जिंकले. बांगलादेशच्या चाहत्यांसाठी वाईट वाटतं...'', असे जाफरने ट्विट केलं.