मतीन खान
अवघ्या १७ व्या वर्षी वेगवान गोलंदाज म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या चेतन शर्मांना मी अगदी तेव्हापासून ओळखतो. तो असा काळ होता, जेव्हा संघात अष्टपैलू कपिल देव हा केवळ एकमेव वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जायचा. त्यावेळी निवड समितीने कपिल देवचा उत्तराधिकारी म्हणून चेतन शर्मामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. १९८३ साली वेस्ट इंडीजविरुद्ध जमशेदपूर वनडेमध्ये शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तब्बल १०४ धावांनी भारत तो सामना हरला होता. मात्र, त्या सामन्यात चेतन शर्मा यांनी नऊ षटकांत ६० धावा देत तीन बळी घेतले होते. त्यानंतर, १७ ऑक्टोबर, १९८४ साली त्यांनी पाकिस्तानविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्याच षटकांत शर्मा यांनी मोहसिन खानचा त्रिफळा उडविला होता. एक आक्रमक आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्व म्हणून चेतन शर्मा यांची त्यावेळी ओळख होती, तसेच मैदानाबाहेर अतरंगी गोष्टी करण्यातही ते पटाईत होते. मला तो क्षण अजूनही आठवतो, जेव्हा ऑस्ट्रेलियाशी चषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला अंतिम चेंडूवर चार धावा हव्या होत्या आणि जावेद मियाँदाद यांनी चेतन शर्मा यांच्या फुलटॉसवर खणखणीत षटकार मारला.
भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात या पराभवाची सल अजूनही कायम आहे. त्यावेळी एका मुलाखतीत चेतन शर्मा म्हणाले की, त्या एका षटकारामुळे मी राष्ट्रीय खलनायक झालेलो आहे. विमानतळावर माझी कडक तपासणी केली जाते. अनेक लोकांनी तर मला मानसिक त्रासही दिलेला आहे. पण जीवनात दुसरी संधी मिळतेच. चेतन शर्मांना यांना ती निवड समितीप्रमुख या रूपात मिळाली. विशेष म्हणजे, केवळ एकदाच नाही, तर दोनदा ते या पदासाठी निवडले गेले. मात्र, यावेळी ज्या काही नाट्यमय घडामोडी त्यांच्याकडून घडलेल्या आहे. त्यावरून असे वाटते की, शर्मा यांचा बाउंसर (स्टिंग ऑपरेशन) अनेकांची दांडी गुल करू शकतो. आपल्या बोलघेवड्या स्वभावामुळे शर्मां यांनी स्वत:चा घात केला. ज्या गोष्टी बोलायला नको त्या सर्वच कॅमऱ्यांसमोर खुल्या केल्या. त्यांच्याबाबत एक गोष्ट म्हणता येईल...
कटू असल्यानेच सत्य पचविणे कठीण असते पूर्ण प्रकरणाचा विचार केला, तर बहुतेक चेतन शर्मा यांनी सत्य उघड केले आहे. त्यांनी केलेली विधाने खोटी नव्हती. ते करायला गेले आणि झाले भलतेच. आता ही बीसीसीआयची जबाबदारी आहे की, चेतन शर्मा यांचा राजीनामा घेतल्यानंतर त्यांनी बोललेल्या गोष्टींचीही चौकशी व्हायला पाहिजे. चेतन काहीही बरळले असतील कदाचित, पण एक गोष्ट सर्वांनीच लक्षात ठेवायला हवी की, खेळापेक्षा मोठा कोणताही खेळाडू नसतो, पण दुर्दैवाने भारतीय क्रिकेटमध्ये सध्या ते घडते आहे. पण चेतन शर्मा यांनी आयुष्यात अनेक चढउतार बघितले. एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखे त्यांचे आयुष्य होते. आयुष्यात ते प्रसिद्धीच्या शिखरावर चढले आणि पडले तर थेट दरीत.
कसोटी पदार्पणात चौथ्या चेंडूवर पाकिस्तानच्या मोहसिन खानला बाद केले.
वनडे विश्वचषकात हॅट् ट्रिक घेणारा पहिला गोलंदाज. न्यूझीलंडविरुद्ध त्यांनी तीनही फलंदाजांना त्रिफळाचित केले होते.
लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर एका कसोटी सामन्यात दहा बळी घेणारे एकमेव भारतीय गोलंदाज. हॉल ऑफ फेममध्ये त्यांचे नाव नोंदविले गेले होते.
१९८९ साली भारतात आयोजित नेहरू कप (वनडे) स्पर्धेत चेतन शर्मा यांनी शतक झळकावले होते. मात्र, याच स्पर्धेतील दुसऱ्या एका सामन्यात फ्लेमिंग याने शर्मा यांना एकाच षटकात पाच चौकार मारले होते.