Interesting history of Asia cup - ३० ऑगस्ट ते १९ सप्टेंबर या कालावधीत पाकिस्तान व श्रीलंका येथे आशिया चषक २०२३ स्पर्धा खेळवली जाणार आहे. BCCI ने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने आशिया चषक हायब्रीड मॉडेलनुसार होणार आहे आणि १३ पैकी ४ सामने पाकिस्तानात, तर उर्वरित श्रीलंकेत होतील. भारताचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत आणि पाकिस्तानविरुद्धचा सामना २ सप्टेंबरा कँडी येथे खेळवला जाणार आहे. पण, तुम्हाला आशिया चषक सुरू होण्यामागचा रंजक इतिहास माहित्येय का?
BCCI चे तत्कालीन अध्यक्ष एन के साळवे यांनी १९८४ मध्ये आशिया चषक स्पर्धेला सुरुवात केली. विस्डेनने दिलेल्या माहितीनुसार, साळवे यांना २५ जून १९८३ रोजी लॉर्ड्सवर खेळवलेली वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल स्टँडवरून पाहायची होती, परंतु त्यांना तिकीट मिळाले नाही. यामुळे संतापलेल्या साळवे यांना राग अनावर झाला. साळवे यांनी ठरवले की आता आपण वर्ल्ड कप इंग्लंडच्या बाहेर घेऊन जायचा. त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) चेअरमन नूर खान यांच्याशी बोलून तयारी केली. यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या (एसएलसी) प्रमुख गामिनी दिसानायकेचाही समावेश करण्यात आला. १९ सप्टेंबर १९८३ रोजी नवी दिल्ली येथे आशियाई क्रिकेट परिषद (ACC) ची स्थापना झाली.
आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. आतापर्यंतच्या इतिहासात आशिया चषकाचे १५ हंगाम झाले आहेत, ज्यामध्ये भारताने सर्वाधिक ७ वेळा विजेतेपद पटकावले आहे. तर श्रीलंकेने ६ जेतेपदं नावावर केली आहेत. पाकिस्तानला केवळ दोनदा विजेतेपद मिळवता आले.