ख्राईस्टचर्च : वेगवान गोलंदाज मॅट हेन्री याने कारकिर्दीत सर्वोच्च कामगिरी करीत २३ धावांत सात गडी बाद केल्यामुळे न्यूझीलंडने गुरुवारी सुरू झालेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा अवघ्या ९५ धावांत खुर्दा उडविला. १९३२ ला आफ्रिका संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबोर्न कसोटीत पहिल्या डावात ३६ धावांत गारद झाला होता. त्यानंतर शंभर धावांच्या आत संघ बाद होण्याची ही पहिलीच वेळ.
भारताला आपल्या मैदानावर कसोटी मालिकेत नमविणाऱ्या आफ्रिकेच्या न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात खराब झाली. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम याने नाणेफेक जिंकताच क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पितृत्व रजेवर गेलेल्या ट्रेनट बोल्टच्या जागी आलेल्या हेन्रीने नव्या चेंडूवर उपाहारापर्यंत पाहुण्यांची दाणादाण उडविली. चहापानानंतर हा संघ ४९.२ षटकांत गारद झाला. त्याआधी ५० धावांत अर्धा संघ माघारी परतला होता. सात फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. कागिसो रबाडा आणि एरिका स्ट्रोमॅन खाते न उघडताच परतले. सर्वाधिक २५ धावा हमजाने केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने दिवसअखेर तीन गड्यांच्या मोबदल्यात ११६ पर्यंत वाटचाल केली. हेन्री निकोल्स ३७ आणि नील वॅगनर दोन हे खेळपट्टीवर होते.
हेन्रीचे यशस्वी पुनरागमनमॅट हेन्री याने नऊ महिन्यानंतर संघात पुनरागमन केले. हेन्रीने शेवटचा कसोटी सामना जूनमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात सहा गडी बाद करीत न्यूझीलंडच्या विजयात मोठी भूमिका बजावली होती. कसोटीच्या एका डावात पाच वा त्याहून अधिक गडी बाद करण्याची ही त्याची पहिलीच वेळ. हेन्रीने प्रतिस्पर्धी कर्णधार डीन एल्गर, एडेन मार्करम, रासी वान डर दुसेन, हमजा, व्हेरेन, रबाडा आणि स्टरमॅन यांना बाद केले. ‘हवामान वेगवान गोलंदाजांना अनुकूल आहे. त्यामुळे कोणताही संघ आधी गोलंदाजी करणे पसंत करतो. आपल्या मैदानावर आणि घरच्या चाहत्यांपुढे अशी कामगिरी केल्याचा आनंद वाटतो,’ असे मॅट हेन्रीने सांगितले.