नवी दिल्ली : भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने पुन्हा एकदा ताबडतोब फलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. अलीकडेच पार पडलेल्या न्यूझीलंडविरूद्धच्या आणि श्रीलंकेविरूद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत संधी न मिळाल्याने त्याने नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आज त्याने शतकी खेळी करून निवड समितीला इशारा दिला आहे. सध्या रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई आणि आसाम यांच्यात सामना खेळवला जात आहे.
रणजी ट्रॉफीत ठोकले झंझावाती शतक दरम्यान, आसामच्या संघाने नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पृथ्वी शॉ आणि मुशीर खान या सलामीवारांनी शानदार सुरूवात करून आसामवर दबाव टाकला. मात्र, मुशीर खान त्याच्या अर्धशतकाला मुकला आणि 42 धावांवर तंबूत परतला. पण पृथ्वी 107 चेंडूवर 100 धावा करून अद्याप खेळपट्टीवर टिकून आहे.
पृथ्वी शॉने वेधले लक्ष पहिल्या दिवसातील पहिल्या सत्रापर्यंत मुंबईची धावसंख्या 36 षटकांत 1 बाद 171 एवढी झाली आहे. मुख्तार हुसैन वगळता आसामच्या कोणत्याच गोलंदाजाला यश मिळाले नाही. पृथ्वीने आपल्या शतकी खेळीत 1 षटकार आणि 15 चौकार मारले. खरं तर मुंबईचा संघ मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात रणजी ट्रॉफीच्या रिंगणात उतरला आहे. तर, आजपासून भारत आणि श्रीलंका यांच्यातील वन डे मालिकेला सुरूवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना गुवाहाटी येथे पार पडणार आहे. या मालिकेतील संघातील वरिष्ठ खेळाडू आगामी वन डे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर संघात पुनरागमन करत आहेत. कारण अलीकडेच पार पडलेल्या ट्वेंटी-20 मालिकेत कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि लोकेश राहुल यांना विश्रांती देण्यात आली होती. ट्वेंटी-20 संघात पृथ्वी शॉला संधी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र, तसे झाले नाही.
श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेसाठी भारताचा वन डे संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.
भारत विरूद्ध श्रीलंका वन डे मालिका
- 10 जानेवारी, मंगळवार, पहिला वन डे सामना, गुवाहटी
- 12 जानेवारी, गुरूवार, दुसरा वन डे सामना, कोलकाता
- 15 जानेवारी, रविवार, तिसरा वन डे सामना, त्रिवेंद्रम
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"