हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला हैदराबादच्या उप्पल येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या नॉर्थ पॅव्हेलियन स्टँडवरून मोहम्मद अझरुद्दीनचे नाव हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाला माजी सरन्यायाधीश व्ही. ईश्वर यांनी मान्यता दिली आहे. तसेच मोहम्मद अझरुद्दीनच्या नावाने छापलेले कोणतेही तिकीट विकले जाणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. भारताचे माजी कर्णधार आणि हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष मोहम्मद अझरुद्दीन यांच्यासाठी मोठा धक्का आहे.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, एचसीएच्या २२६ संलग्न युनिट्सपैकी एक असलेल्या लॉर्ड्स क्रिकेट क्लब म्हणजेच एलसीसीने या वर्षाच्या सुरुवातीला तक्रार दाखल केल्यानंतर १९ एप्रिल रोजी हा निर्णय देण्यात आला. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी दाखल केलेल्या तक्रारीत असा युक्तिवाद करण्यात आला होता की, अझरुद्दीनच्या नावावर नॉर्थ स्टँडचे नाव ठेवणे हे एचसीएच्या मेमोरँडम ऑफ असोसिएशन आणि त्याच्या अंतर्गत नियमांचे उल्लंघन आहे.
हे प्रकरण २०१९ मधील आहे, जेव्हा मोहम्मद अझरुद्दीन हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्याच वर्षी २५ नोव्हेंबर रोजी एक बैठक बोलावण्यात आली, ज्यामध्ये नॉर्थ स्टँडचे नाव बदलून 'अझरुद्दीन स्टँड' असे ठेवण्याचे मान्य करण्यात आले. याआधी नॉर्थ स्टँडला व्हीव्हीएस लक्ष्मण स्टँड म्हणून ओळखले जात होते. फेब्रुवारी २०२५ मध्ये एचसीए समितीच्या एका सदस्यानेच तक्रार दाखल केली. मोहम्मद अझरुद्दीन यांच्या नावावर स्टँड ठेवल्याने एचसीएच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा त्यात करण्यात आला. एचसीएच्या नियम क्रमांक ३८ नुसार, परिषदेचा कोणताही सदस्य स्वतःच्या बाजूने निर्णय घेऊ शकत नाही.
मोहम्मद अझरुद्दीन यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले की, यामुळे हैदराबाद क्रिकेट असोसिएशनची बदनामी होईल. संपूर्ण जग एचसीएवर हसेल. १७ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत मी सुमारे १० वर्षे भारतीय संघाचे कर्णधारपद संभाळले. तुम्ही हैदराबादमधील सर्व क्रिकेटपटूंशी असे वागता का? ही खूप लज्जास्पद गोष्ट आहे. आम्ही याविरुद्ध उच्च न्यायालयात जाऊ
याआधीही हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानही वादात सापडले. एसआरएच संघ व्यवस्थापनाने एचसीएवर आरोप केला होता की, त्यांचे वरिष्ठ अधिकारी तिकीट विक्रीच्या बाबतीत हस्तक्षेप करत आहेत. अशा परिस्थितीत, एसआरएच व्यवस्थापनाने त्यांचे होम ग्राउंड हलवण्याची धमकीही दिली होती.