हैदराबाद - हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला एक मोठा धक्का देण्यात आला आहे. एपेक्स कॉन्सीलने हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदावरुन मोहम्मद अझहरुद्दीन यांना हटविण्याचा निर्णय घेतला आहे. अझहरुद्दीनने क्रिकेट बोर्डाच्या काही नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला आहे.
परिषदेने टीम इंडियाचा माजी कर्णधार अझहरुद्दीनविरुद्ध प्रलंबित प्रकरणांचा हवाला दिला आहे. याप्रकरणी कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. एचसीएस सदस्यांनी आपल्याविरुद्ध तक्रारी केल्या आहेत. त्यामुळेच, परिषदेच्या बैठकीत आपणास कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात येत असल्याचं परिषदेनं म्हटलं आहे. आपल्याविरुद्धच्या तक्रारींची चौकशी पूर्ण होईपर्यंत आपले एचसीएसचं सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचेही परिषदेनं म्हटलं आहे.
अझहरुद्दीन यांच्या नियुक्तीवरच अनेक प्रश्न निर्माण करण्यात आले होते. बोर्डाच्या अनेक सदस्यांनी अझहरुद्दीन यांच्या काही निर्णयांना विरोध करत नाराजी दर्शवली होती. एचसीएस बोर्डातील सदस्यांना विचारत न घेताच, अध्यक्ष अझहरुद्दीन निर्णय घेतात, असाही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. 25 मे रोजी झालेल्या बैठकीतच अझहर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, 27 सप्टेंबर 2019 रोजी अझहरुद्दीन यांना अध्यक्षपदावर नियुक्त करण्यात आलं होतं.