- अयाज मेमनचेन्नई : अखेर सनरायझर्स हैदराबादने यंदाच्या सत्रातील आपला पहिला विजय मिळवताना पंजाब किंग्ज संघाचा ९ गड्यांनी धुव्वा उडवला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात हैदराबादने आधी गोलंदाजीत वर्चस्व राखल्यानंतर फलंदाजीतही दबदबा राखताना पंजाबची हवा काढली. पंजाबचा डाव १२० धावांत गुंडाळल्यानंतर हैदराबादने केवळ एका फलंदाजाच्या मोबदल्यात १८.४ षटकांत विजय मिळवला.
पंजाबचा खेळ इतका खराब कसा होत आहे हे कळाले नाही. त्यांचे खेळावर लक्ष केंद्रित झाल्याचे दिसत नाही. हैदराबादने जबरदस्त गोलंदाजी केली. माफक धावसंख्येत पंजाबला रोखल्यानंतर हैदराबादने जॉनी बेयरस्टोच्या जोरावर सहजपणे विजय मिळवला. विजयापेक्षा गुणांचे खाते उघडता आले हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरले.या खेळपट्टीवर १४० धावांचे आव्हानही सोपे ठरले नसते, मात्र पंजाबने २०-२५ धावा कमीच केल्या. हैदराबादच्या गोलंदाजांना त्यांचे श्रेय द्यावे लागेल. बेयरस्टो आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नर यांनी संघाच्या विजयाचा पाया रचताना नेहमीप्रमाणे दमदार सुरुवात करून दिली. ७३ धावांची दिलेली सलामी आणि त्यानंतर बेयरस्टोने घेतलेला आक्रमक पवित्रा यामुळे पंजाबचे मानसिक खच्चीकरण झाले. बेयरस्टोने ५६ चेंडूंत नाबाद ६३ धावांसह विजयी खेळी केली. फॅबियन अॅलेनने वॉर्नरचा मिळवलेला बळी हेच पंजाबसाठी एकमेव यश ठरले.
त्याआधी, कर्णधार लोकेश राहुल लवकर बाद झाल्यानंतर पंजाब संघ दडपणात आला. गेल्या सत्रातही पंजाबला कामगिरीत सातत्य राखण्यात यश आले नव्हते. त्यांचा संघ ४-५ सामन्यात चांगला खेळ करतो आणि त्यानंतर ढेपाळतो. अद्याप या संघाला पूर्ण लय सापडलेली नाही. आघाडीच्या तीन फलंदाजांवर पंजाब अवलंबून असल्याचे पुन्हा दिसून आले. खलील अहमदने भेदक मारा करताना पंजाबला अडचणीत आणले. याशिवाय राशिद खान, अभिषेक शर्मा यांनीही मोक्याच्यावेळी धक्के देत पंजाबला रोखण्यात मोलाची कामगिरी केली.
महत्त्वाचे :nटी-२० क्रिकेटमध्ये १४३ डावांत ५ हजार धावा पूर्ण करत लोकेश राहुल दुसरा वेगवान फलंदाज ठरला. ख्रिस गेलने १३२ डावांत हा टप्पा गाठला होता. nटी-२० क्रिकेटमध्ये ५ हजार धावा पूर्ण करणारा राहुल वेगवान भारतीय ठरला. दुसऱ्या क्रमांकावरील विराट कोहलीने १६७ डावांमध्ये ही कामगिरी केली होती. nनिकोलस पूरन यंदा चारपैकी तीन सामन्यांत शून्यावर बाद झाला. याआधीच्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ति ९ धावांवर बाद झाला होता, तर राजस्थान व चेन्नईविरुद्धही तो शून्यावर बाद झाला.
...आणि काव्या हसलीसनरायझर्स हैदराबादने धमाकेदार विजय मिळवताना यंदाच्या सत्रात गुणांचे खाते उघडले. त्यांनी आपल्या तुफानी कामगिरीच्या जोरावर पंजाब किंग्ज संघाची हवाच काढली. या शानदार विजयासह हैदराबाद संघाची सीईओ काव्या मारन हिच्या चेहऱ्यावरील कळीही खुलली. याआधीच्या हैदराबादच्या तिन्ही सामन्यांसाठी उपस्थिती दर्शविलेल्या काव्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती. हैदराबादला तिन्ही सामन्यांत पराभव पत्करावा लागल्यानंतर काव्याचा उदास झालेला चेहरा चर्चेचा विषय ठरत होता. मात्र, आता हैदराबादने पहिला विजय मिळवल्यानंतर पुन्हा एकदा काव्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी, ‘अखेर काव्या हसली,’ अशा कॅप्शननी अनेकांनी हैदराबाद संघ आणि काव्या यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.