Join us  

मी नेहमी प्रामाणिक, पारदर्शक काम केले : जयसूर्या

भ्रष्टाचार आरोपावर चोख उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 6:28 AM

Open in App

कोलंबो: श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्यावर आयसीसीने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. जयसूर्यानेही या आरोपांना चोख स्पष्टीकरण दिले. स्वत:वरील सर्व आरोप फेटाळून लावताना जयसूर्याने,‘ मी प्रत्येक काम प्रामाणिकपणे आणि पारदर्शक राहून केले,’ असा दावा केला.

आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी कायद्यांचे उल्लंघन केल्याचा ठपका जयसूर्यावर ठेवण्यात आला होता. मात्र आपल्यावर तपासात सहकार्य केले नसल्यामुळे आरोप ठेवण्यात आले असून माझा मॅच फिक्सिंगच्या कोणत्याही प्रकरणाशी संबंध नसल्याचे जयसूर्याने म्हटले आहे.

डावखुरा धडाकेबाज फलंदाज राहिलेला जयसूर्या म्हणाला, ‘मी आतापर्यंत प्रत्येक काम प्रामाणिकपणे केले आहे व यापुढेही करीत राहणार. माझ्या वकिलांनी या प्रकरणी प्रसारमाध्यमांशी अधिक बोलू नये असे सांगितले आहे. त्यामुळे मी या विषयी फार स्पष्टीकरण देणार नाही, मात्र आपली बाजू दोन आठवड्याच्या आत योग्यरीत्या आयसीसीसमोर मांडू, असा आत्मविश्वास त्याने व्यक्त केला. ‘माझ्याकडे उत्तर देण्यास १४ दिवस असून अधिक बोललो तरी आयसीसी आचारसंहितेचे उल्लंघन होण्याची शक्यता आहे,’ असेही त्याने म्हटले.

लंकेचा मुख्य निवडकर्ता राहिलेला ४९ वर्षांचा जयसूर्या याने स्वत:वरील आरोप मॅचफिक्सिंग अथवा पीच फिक्सिंग आणि सट्टेबाजीशी संबंधित नसल्याचे सांगितले. माझ्यावरील नेमके आरोप काय, हे देखील आयसीसीने स्पष्ट केले नाही. पण मी नेमक्या शब्दात उत्तर देईन, इतकेच तो म्हणाला.

टॅग्स :क्रिकेट सट्टेबाजी