मुंबई, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने आगामी कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. दुखापतीमुळे त्याला ही माघार घ्यावी लागली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी बुमराला विश्रांती देण्यात आली होती. पण कसोटी मालिकेत मात्र तो खेळणार होता. पण आता त्याला दुखापत झाल्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळू शकणार नाही. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतल्यानंतर जसप्रीत बुमराहने बुधवारी सोशल मीडियावर चाहत्यांना भावनिक साद घातली आहे.
बुमराच्या पाठीला फ्रॅक्चर झाल्याचे समजते आहे. पाठिच्या खालच्या भागातील हाडाला फ्रॅक्चर झाल्यामुळे बुमराला काही दिवस विश्रांती घ्यावी लागणार आहे. या दुखापतीवर पहिल्यांदा त्याच्यावर उपचार केले जातील. दुखापतीतून सावरल्यावर त्याचे पुनर्वसन केले जाईल आणि त्यानंतर फिटनेस टेस्ट पास केल्यावर त्याला संघात स्थान दिले जाईल. आगामी ट्वेन्टी-20 विश्वचषक पाहता बुमराला लगेच खेळवण्याचा निर्णय भारतीय संघ व्यवस्थापन घेणार नाही. बुमराच्या जागी कसोटी संघात वेगवान गोलंदाज उमेश यादवला स्थान देण्यात आले आहे.
बुमराहनं ट्विट केलं की,''दुखापत हा खेळाचा भागच आहे. लवकरात लवकर बरा होण्यासाठी तुम्ही दिलेल्या शुभेच्छांचे आभार. माझा निर्धार आणखी दृढ झाला आहे आणि आता आहे त्यापेक्षा अधिक दमदार कामगिरीनं कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करेल.''