नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात फलंदाजी करताना जखमी झालेला भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आता पूर्णपणे फिट असून, ९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या १४ व्या पर्वात पंजाब किंग्सकडून खेळण्यास सज्ज आहे.ॲडिलेडच्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याचा आखूड टप्प्याचा चेंडू मनगटावर आदळल्याने शमी संपूर्ण दौऱ्यातून बाहेर पडला. त्याने लगेच भारतात परतून बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचार घेतले. आता तो पूर्णपणे फिट आहे.तो म्हणाला, ‘फलंदाजी करतेवेळी जखमी होणे दुर्दैवी ठरले. कारण दीर्घकाळापासून मला फिटनेसची कुठलीही समस्या नव्हती. तथापि आपण यात काहीच करू शकत नाही. जखमा हा खेळाचा एक भाग आहे. मी नेहमी सकारात्मक पैलूंवर लक्ष देतो.’
‘मी मुख्य निवडकर्ता असतो तर आश्विनला मर्यादित षटकांच्या सामन्यात नक्की खेळविले असते. तो एक अनुभवी गोलंदाज आहे. त्याच्या चेंडूत विविधतादेखील आहे. फिरकीपटूंमध्ये अनुभव फार उशिरा येतो, असे म्हटले जाते. आश्विनने अनेक वर्षे गोलंदाजी केल्यामुळे तो अनुभवसंपन्न बनला. कसोटी सामन्यातील त्याचा फॉर्म पाहता मर्यादित षटकांच्या सामन्यात त्याचा मोठा लाभ होऊ शकेल.’- दिलीप वेंगसरकर