नवी दिल्ली : सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये टी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतील सलामीचे दोन सामने जिंकून यजमान भारतीय संघाने मालिकेवर कब्जा केला आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. मात्र या विश्वचषकापूर्वी भारताला जसप्रीत बुमराहच्या रूपात मोठा झटका बसला आहे. बुमराह यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेला मुकणार असल्याचे अखेर नक्की झाले आहे. बीसीसीआयने अधिकृतरित्या ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून जसप्रीत बुमराह विश्वचषकात खेळणार का यावरून संभ्रम निर्माण झाला होता. BCCI अध्यक्ष सौरव गांगुली आणि भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड या दोघांनीही टी-20 विश्वचषकाला अजून वेळ आहे असे सांगत, जसप्रीत बुमराह खेळेल की नाही हे सांगणे टाळले होते. पण अखेर काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चाच खऱ्या ठरल्या आणि नको तेच घडले.
जसप्रीत बुमराहचे भावनिक ट्विट जसप्रीत बुमराह आगामी टी-20 विश्वचषकातून बाहेर गेल्याने चाहते निराश झाले आहेत. अशातच बुमराहने एक भावनिक ट्विट करून संघाला सपोर्ट करण्यासाठी लवकरच उपलब्ध असणार असल्याचे संकेत दिले आहेत. "यावेळेस मी टी-20 विश्वचषकाचा भाग होणार नाही हे पाहून निराश झालो आहे. परंतु माझ्या प्रियजनांकडून मिळालेल्या शुभेच्छा, काळजी आणि समर्थनाबद्दल मी आभारी आहे. जसजसा मी बरा होईल, तसतसे मी ऑस्ट्रेलियातील भारतीय संघाच्या मोहिमेला सपोर्ट करण्यासाठी उपलब्ध असेन", अशा आशयाचे ट्विट करून बुमराहने चाहत्यांचे आभार मानले आहेत.
विश्वचषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.
भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक
23 ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न27 ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, 12.30 वाजल्यापासून, सिडनी30 ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, 4.30 वाजल्यापासून, पर्थ2 नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, 1.30 वाजल्यापासून, एडलेड6 नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न१३ नोव्हेंबरला अंतिम सामना