रोहित नाईकमुंबई : ‘विराट कोहलीने टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर भारताच्या टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. तो गेल्या ८-९ वर्षांपासून तिन्ही प्रकारात नेतृत्त्व करत आहे. त्याचे मुख्य लक्ष कसोटी क्रिकेटच्या कामगिरीकडे आहे, याचा आनंद आहे,’ अशी प्रतिक्रिया भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी ‘लोकमत’कडे दिली.
वेंगसरकर म्हणाले की, ‘कोहली सुमारे ८-९ वर्षांपासून भारताचे तिन्ही प्रकारात नेतृत्व करतोय. भारतीय कर्णधारावर कायम दबाव असतो. शिवाय एक फलंदाज म्हणूनही त्याच्याकडून खूप अपेक्षा असतात. ८-९ वर्षे हा दबाव घेऊन खेळणे सोपी गोष्ट नाही. टी-२० क्रिकेटमध्ये कोहलीने आपल्या नेतृत्त्वात भारताला किंवा आरसीबीला अद्याप एकही मोठे जेतेपद मिळवून दिलेले नाही. या गोष्टीचे अपयशही त्याला सलत असेल किंवा त्याच्या निर्णयामागचे हेही एक कारण असेल.
महत्त्वाचे म्हणजे त्याचे मुख्य लक्ष कसोटी क्रिकेटकडे असल्याचा मला आनंद आहे. कसोटी क्रिकेटमध्ये तुमचा खरा कस लागतो. यात तुम्ही चांगले खेळलात, तरच तुमची महानता सिद्ध होते. टी-२० व एकदिवसीय क्रिकेटमधील प्रसिद्धी तात्पुरती असते आणि प्रेक्षक याकडे मनोरंजनाच्या दृष्टिने पाहतात.’ तसेच, टी-२० विश्वचषकात भारतासह वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे उपांत्य फेरी गाठतील, असा अंदाजही वेंगसरकर यांनी व्यक्त केला.
- क्रिकेटविश्वाचे लक्ष लागलेल्या भारत-पाक लढतीविषयी वेंगसरकर यांनी सांगितले की, ‘भारत-पाकिस्तान सामना नेहमीच वेगळा ठरतो.
- आगामी सामन्यात भारताचे पारडे नक्कीच वरचढ आहे. भारतीय खेळाडू सातत्याने खेळत असल्याने त्यांच्याकडे मॅच फिटनेस आहे. असे असले, तरी दोन्ही संघांवर दबाव असणार. या सामन्यात जो खेळाडू चमकतो, तो हीरो ठरतो.
- त्यामुळे प्रत्येकजण या सामन्यात छाप पाडण्यास उत्सुक असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यूएईमध्ये सामना होणार असल्याने दोन्ही संघांचे पाठीराखे समान संख्येने उपस्थित राहतील. त्यामुळे जो संघ मानसिकरित्या कणखर राहील तोच संघ या सामन्यात बाजी मारेल.’
‘आयपीएलनंतर लगेच टी-२० विश्वचषक खेळणे क्रिकेटपटूंसाठी आव्हानात्मक ठरेल. दुखापती टाळण्यावर लक्ष देऊन खेळणे सोपे नसते. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेसाठी पूर्ण तंदुरुस्त राहण्याकडे खेळाडूंना लक्ष द्यावे लागेल. यामुळे संघ व्यवस्थापनावरील जबाबदारी अधिक वाढेल.’ दिलीप वेंगसरकर