Join us  

‘सत्य सर्वांपुढे ठेवल्याबद्दल मी ‘लोकमत’चा ऋणी’

क्रिकेटपटू राजवर्धन हंगरगेकर याने व्यक्त केली कृतज्ञता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 5:41 AM

Open in App

-  नीलेश देशपांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगरगेकर याने वयासंबंधी निर्माण झालेल्या वादाच्या सखोल चौकशीअंती सत्य सर्वांपुढे मांडल्याबद्दल ‘लोकमत समूहा’चे आभार मानले आहेत.

आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळण्यास सज्ज असलेला राजवर्धन सध्या चेन्नईत सरावात व्यस्त आहे. ‘लोकमत’ने काही दिवसांआधी याबाबत त्याचे मूळ गाव असलेल्या उस्मानाबाद येथे चौकशी करीत  सत्यता पडताळणारे सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. याबाबत राजवर्धनचे मत जाणून घेतले असता तो म्हणाला, ‘खरेतर खेळावर लक्ष केंद्रित केल्यामुळे मी याबाबत बोलू इच्छित नाही, तरीही ‘लोकमत समूहा’ने याबाबत सखोल चौकशीअंती सत्य सर्वांपुढे आणले, त्यासाठी मी ऋणी आहे.’ लोकमत समूृहाने राजवर्धनला मोठ्या कारकिर्दिसाठी खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला.

विश्वचषक जिंकून आल्यानंतर महाराष्ट्राचे क्रीडा संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी बीसीसीआयला पत्र लिहून राजवर्धनने वय लपविल्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी विनंती केली होती. ८ फेब्रुवारी रोजी बीसीसीआय सचिव जय शाह यांना उद्देशून लिहिलेल्या या पत्रात राजवर्धन याने स्वत:च्या जन्मदाखल्यात खोडतोड करीत ‘१० जानेवारी २००१’ऐवजी ‘१० नोव्हेंबर २००२’ असे केल्याचे म्हटले होते. विश्वचषकात खेळताना तो अधिक वयाचा होता, असे बकोरिया यांचे म्हणणे होते. या खेळाडूच्या वयावरून वाद निर्माण होताच ‘लोकमत’ने सखोल चौकशी करीत वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तात राजवर्धनच्या वयाचे शासकीय प्रमाणपत्र आणि राजवर्धनने शिक्षण घेतलेल्या  तेरणा पब्लिक स्कूल, उस्मानाबाद शाळेचे सध्या हयात नसलेले मुख्याध्यापक शरद कुमार यांच्याकडून खाडाखोड झालेले प्रमाणपत्र पुरावा म्हणून प्रकाशित केले होते. 

आयपीएल लिलावात सीएसकेने एक कोटी पाच लाख रुपयात संघात घेतलेल्या राजवर्धन याने या वादात ‘लोकमत’ने घेतलेल्या भूमिकेची प्रशंसा केली.

Open in App