भारतीय क्रिकेटमध्ये मधल्या काळात वार्षिक कराराचा मुद्दा बराच गाजला... युवा फलंदाज इशान किशन आणि श्रेयस अय्यर या दोघांना अचानक बीसीसीआयने वार्षिक करारातून वगळले.. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या इशानने संधी मिळत नसल्याचे पाहून मानसिक थकवा असल्याचे सांगितले आणि सुट्टी घेऊन मायदेशात परतला. पण, त्यानंतर तो दुबईत मित्रांसोबत पार्टी करताना दिसला. संघात निवड व्हायची असेल त्याने देशांतर्गत क्रिकेट खेळावे, असा सल्ला मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिलेला. त्याकडे इशान व श्रेयस यांनी काणा डोळा केला. त्यानंतर बीसीसीआयने या दोघांच्या नावावर काट मारली..
बीसीसीआयने वार्षिक करारातून वगळल्यानंतर श्रेयस रणजी करंडक स्पर्धेत खेळला, परंतु तो पर्यंत वेळ निघून गेली होती. या दोघांना वार्षित करार यादीतून बाहेर ठेवण्याचा निर्णय निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांचा होता, BCCI चे सचिव जय शाह यांनी सांगितले. बोर्डाच्या सूचना असूनही दोन्ही फलंदाज देशांतर्गत स्पर्धेत खेळले नाहीत. यावर BCCI ने कठोता दाखवत इशान आणि अय्यरला करारातून बाहेर फेकले होते. मुंबईचा संघ रणजी खेळत असताना अय्यर कोलकाता नाईट रायडर्ससाठी आयपीएलच्या तयारीत व्यस्त होता.
जय शाह म्हणाले, “तुम्ही BCCI चे संविधान पाहू शकता. मी फक्त निवड समितीची बैठक बोलावतो. इशान व अय्यरला वार्षिक करारातून वगळण्याचा निर्णय अजित आगरकरा यांचा होता. हे दोन खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळत नसताना त्यांना बाहेर ठेवण्याचा निर्णय आगरकरचा होता. माझे काम फक्त त्याची अंमलबजावणी करणे आहे. संजू सॅमसनसारखा चांगला खेळाडू आम्हाला मिळाला.''
या निर्णयानंतर दोन्ही खेळाडूंशी नंतर बोलणेही झाले होते, असेही जय शाह यांनी सांगितले. हार्दिक पांड्यानेही देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास होकार दिला होता, असेही ते म्हणाले.