नवी दिल्ली : १५ ऑगस्ट २०२२ रोजी देश आपला ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. भारत सरकारकडून 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. या मोहिमेअंतर्गत देशभरातील नागरिक सोशल मीडियावर तिरंग्याचा फोटो आपल्या प्रोफाईल फोटोवर ठेवत आहेत. या दरम्यान भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) देखील आपला प्रोफाईल फोटो बदलून या मोहिमेत सहभाग नोंदवला आहे.
धोनीने बदलला प्रोफाईल फोटो
धोनीने शुक्रवारी इंस्टाग्रामवरील आपला प्रोफाईल फोटो बदलला आणि तिरंग्याचा फोटो लावला. या फोटोवर एक खास संदेश देखील लिहण्यात आला आहे. "माझे भाग्य आहे की मी एक भारतीय आहे", असे म्हणत धोनीने देशवासियांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. भारतीय संघाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला धोनी सोशल मीडियावर खूप कमी सक्रिय असतो. फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर धोनीने मोठ्या कालावधीपासून एकही पोस्ट केली नाही. मात्र 'हर घर तिरंगा' या मोहिमेत सहभागी होऊन चाहत्यांना एक संदेश दिला आहे.
महेंद्रसिंग धोनीशिवाय अन्य क्रिकेटपटूंनी देखील या मोहिमेत सहभाग नोंदवला आहे. भारतीय संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाणने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो तिरंग्यासमोर उभा राहून या मोहिमेत सहभागी होण्याचे देशवासियांना आवाहन करत आहे. इरफान पठाणच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून नेटकरी इरफानचे कौतुक करत आहेत.
१५ ऑगस्ट या दिवसाचे धोनीच्या आयुष्याशी एक खास नाते आहे. कारण दिग्गज धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला होता. तेव्हा इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत धोनीने आपण निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती.
Web Title: I am lucky to be an Indian, says Dhoni, who has participated in the Har Ghar Tiranga campaign
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.