आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंत महान फिरकीपटू हरभजन सिंग ( Harbhajan Singh) यानं त्याच्या कारकीर्दिच्या अखेरच्या टप्प्यात बीसीसीआयकडून न मिळालेल्या पाठिंब्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानं यावेळी महेंद्रसिंग धोनीचं नाव घेतले. बोर्डाकडून धोनीला खूप पाठिंबा मिळाला, जसा कोणालाच मिळालेला नाही. भज्जीच्या विधानानं सर्वांच्या भूवया उंचावल्या. त्यानंतर भज्जी विरुद्ध धोनी असे चित्र रंगवण्यात आले. पण, भज्जीननं आता धोनीबाबत आणखी एक विधान केले आहे.
हरभजन सिंगनं भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या (BCCI) काही अधिकाऱ्यांवर आरोप केले होते. आपलं संघात पुनरागमन होऊ नये असं त्यावेळी काही अधिकाऱ्यांना वाटत होतं, असं हरभजन म्हणाला होता. त्यावेळी धोनी कर्णधार होता आणि त्यानंदेखील अधिकाऱ्यांना सपोर्ट केला. जर माझी कधी बायोपिक किंवा वेब सीरिज (Web Series) तयार झाली, तर त्यात एक नाही, अनेक व्हिलन असतील, असंही त्यानं सांगितलं होतं.
भज्जीनं News18 ला दिलेल्या मुलाखतीत धोनी अन् त्याच्यांतील वादांच्या चर्चा खोडून काढल्या. आम्ही दोघं चांगले मित्र आहोत असा दावा भज्जीनं केला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकलेल्या २००७ चा ट्वेंटी-२० आणि २०११चा वन डे वर्ल्ड कप संघाचा भज्जी सदस्य होता. धोनीसोबतच्या भांडणाच्या विधानावर भज्जी म्हणाला,''मी काय त्याच्याशी लग्न केलेलं नाही.''
आता भज्जीनं त्याच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला. तो म्हणाला,''प्रत्येकानं त्या विधानाचा आपापल्या सोईनं चुकीचा अर्थ लावला. २०१२नंतर अनेक चांगल्या गोष्टी झाल्या असत्या, हे मला सांगायचे होते. सेहवाग, मी, युवराज, गंभीर आम्ही सर्व एकप्रकारे भारतीय क्रिकेटमधून निवृत्तच झालो होतो, परंतु आम्ही आयपीएलमध्ये खेळत होतो. २०११नंतर आम्ही पुन्हा एकत्र खेळलो नाही. का?, यापैकी काही खेळाडूच २०१५ चा वर्ल्ड कप खेळले, का?''
४१ वर्षीय भज्जीनं धोनीबाबत कोणतीच तक्रार नसल्याचे स्पष्ट केले, परंतु बीसीसीआय व निवड समितीसाठी त्याच्याकडे काही प्रश्न आहेत. ''धोनीबाबत माझी काहीच तक्रार नाही. या काळात तो माझा चांगला मित्र बनला होता. माझी तक्रार बीसीसीआयशी, त्याकाळच्या सरकारशी आहे. मी बीसीसीआयला सरकार म्हणतोय. त्यावेळच्या निवड समितीनं त्यांच्या कामाला न्याय दिला नाही. त्यांना संघ विस्कळीत करायचा होता,''असे भज्जी म्हणाला.
''संघात दिग्गज खेळाडू असताना आणि ते चांगली कामगिरी करत असतानाही नव्या खेळाडूंना आणण्यात काय अर्थ होता?, हा प्रश्न जेव्हा मी निवड समितीला विचारला, तेव्हा त्यांनी आमच्या हातात काही नाही, असे उत्तर दिले. मग ते निवड समिती सदस्य कशासाठी होते?,''असा सवाल त्यानं केला.