Sourav Ganguly On Rishabh Pant: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनं टीम इंडियाचा युवा क्रिकेटपटू रिषभ पंतचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. रिषभच्या फॉर्मवर सध्या सर्वच फिदा झाले आहेत. क्रिकेट वर्तुळातील अनेक दिग्गजांच्या तोंडी आज रिषभ पंत याचंच नाव आहे. सेहवाग, युवराज, इंजमाम यांसारख्या इतरही अनेक माजी क्रिकेटपटूंनी पंतचं कौतुक केल्यानंतर आता बीसीसीआयच्या अध्यक्षाचीही यात भर पडली आहे.
"भारतीय संघातील सर्वच खेळाडू उत्तम आहेत. बीसीसीआयचा अध्यक्ष असल्यानं मी कोणत्या एका खेळाडूचं नाव घेऊ शकत नाही. मला विराट आणि रोहितची फलंदाजी आवडते. पण मला रिषभ पंतनं वेड लावलंय. जसप्रित बुमराह आणि मोहम्मद शमीही मला आवडतो. शार्दुल ठाकूर देखील जबरदस्त आहे. कारण त्याच्यात हिंमत आहे", असं सौरव गांगुली म्हणाला. एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता.
गांगुलीला जानेवारीत हृदयविकारामुळं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर अँजिओप्लास्टीची सर्जरी देखील करण्यात आली आहे. त्याबाबत बोलताना गांगुलीनं आता पूर्णपणे बरं आणि फिट असल्याचं सांगितलं. "मी आता पूर्णपणे फीट आहे आणि पुन्हा कामाला देखील लागलोय", असं गांगुली म्हणाला. २ जानेवारी रोजी छातीत दुखू लागल्यामुळे गांगुलीला कोलकाताच्या वुडलँड्स हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याच दिवशी गांगुलीवर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर २७ जानेवारी रोजी गांगुली पुन्हा रुग्णालयात दाखल झाला होता. यावेळी कोलकातातील अपोलो रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले होते आणि दुसऱ्यांदा अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यानंतर गांगुलीला आरामाचा सल्ला देण्यात आला होता.