नवी दिल्ली : ‘शारजाह येथे खेळलेल्या अनेक सामन्यांच्या आठवणी आजही स्मरणात आहेत. एका गोष्टीचा मोठा अभिमान आहे की, येथे एकाच डावात पाच बळी मिळवणारा मी एकमेव भारतीय आहे,’ असे भारताचे माजी क्रिकेटपटू संजीव शर्मा यांनी सांगितले. ५४ वर्षीय या दिल्लीकर क्रिकेटपटूने भारताकडून खेळलेल्या १९८८ ते १९९० अशा तीन सत्रांतील आठवणींना उजाळा दिला.
१९९० साली लॉडर््स येथे झालेल्या कसोटीत संजीव यांच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक किरण मोरे यांनी इंग्लंडचा दिग्गज कर्णधार ग्रॅहम गूच यांचा झेल सोडला होता. अनेक क्रिकेटप्रेमी या प्रसंगाला दुर्दैवी क्षण मानतात. या जीवदानाचा फायदा घेत गूचने या सामन्यात ३३३ आणि १२३ धावांची स्वप्नवत खेळी करत इंग्लंडला मोठा विजय मिळवून दिला होता. दखल घेण्याची बाब म्हणजे या सामन्यानंतर संजीव यांना भारताकडून एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. याविषयी संजीव म्हणाले की, ‘अशा गोष्टी खेळाचा एक भाग असतात. परंतु, कोणाला माहीत होते की, जर मोरेने तो झेल पकडला असता, तर माझी कसोटी कारकीर्द वेगळी असती.’ त्यांनी पुढे सांगितले की, ‘या सामन्यातील दुसऱ्या डावात मी संघाकडून सर्वोच्च वैयक्तिक खेळी केली होती. मी ३८ धावा केल्या होत्या. आणि ही खेळी तेंडुलकर, वेंगसरकर, अझरुद्दीन आणि मांजरेकर यांच्या खेळीपेक्षा अधिक होती.’वर्तमानपत्रांमध्ये माझेच छायाचित्र!याव्यतिरिक्त संजीव यांनी १९८९ सालच्या वेस्ट इंडिज दौºयाच्या आठवणींनाही उजाळा दिला. या दौºयात त्यांनी इयान बिशप यांच्या गोलंदाजीची आठवण सांगितली. ते म्हणाले, ‘८० आणि ९०च्या दशकात बिशप सर्वात वेगवान गोलंदाज होते. त्या दौºयात बिशप यांनी मला क्लीनबोल्ड केले होते आणि मधली यष्टी उडून यष्टिरक्षक जैफ डुजोनकडे गेली होती. दुसºया दिवशी मी आणि अजय शर्मा चर्चा करत होतो की कोणी किती धावा केल्या. पण मी म्हणालो की, कोणीही कितीही धावा केल्या असू दे, पण वर्तमानपत्रांमध्ये माझेच छायाचित्र छापून आले आहे.’ त्या दिवशी विंडिजमधील बहुतेक वर्तमानपत्रांमध्ये संजीव यांचे क्लीनबोल्ड होतानाचे छायाचित्र छापले गेले होते.