मेलबर्न : ‘फलंदाजी क्रमात एका विशिष्ट स्थानावर खेळण्यास मी प्राधान्य देत नाही. संघाच्या गरजेनुसार कुठल्याही स्थानावर फलंदाजीत मी सज्ज आहे,’ असे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने म्हटले.
तीन सामन्यांच्या मालिकेत ‘हिरो’ ठरलेला ‘मॅच फिनिशर’ माही पुढे म्हणाला, ‘साधारणत: सहाव्या स्थानावर खेळण्याचा माझा अनुभव आहे. आज चौथ्या स्थानावर आलो होतो. मी कुठल्याही स्थानावर खेळण्याचा आनंद लुटतो. महत्त्वाचे असे की संघाची गरज काय आहे, मी काय करायला हवे. मी चौथ्या किंवा सहाव्या स्थानावर खेळलो काय, हे महत्त्वाचे नाही. संघात संतुलन साधले जाते काय, हे महत्त्वपूर्ण आहे. १४ वर्षे खेळल्यानंतर मी सहाव्या स्थानावर फलंदाजी करू शकत नाही, असे म्हणणे योग्य ठरणार नाही.’ सामन्यात काय डावपेच होते असे विचारताच धोनी म्हणाला,‘ही संथ खेळपट्टी होती. त्यामुळे मनाप्रमाणे फटके मारणे कठीण होते. चांगला मारा करणाऱ्यांना फटकेबाजी करण्यात शहाणपणा नव्हताच. केदारने मला चांगली साथ दिली. अप्रतिम फटकेबाजी करत त्याने विजयात मोलाची भर घातली.’ (वृत्तसंस्था)