Join us  

VIDEO: "विश्वचषकातील पहिला सामना खेळण्यासाठी मी तयार आहे", रोहित शर्माने किंग कोहलीची घेतली मुलाखत

आशिया चषकातील भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2022 12:45 PM

Open in App

नवी दिल्ली : आशिया चषकाची (Asia Cup 2022) स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन पोहचली आहे. स्पर्धेचा प्रबळ दावेदार मानला जाणार भारतीय संघ स्पर्घेची अंतिम फेरी गाठू शकला नाही. भारतीय संघाचा या स्पर्धेतील शेवटचा सामना गुरूवारी अफगाणिस्तानविरूद्ध (IND vs AFG) पार पडला. हा सामना भारतासाठी अतिशय खास आणि अविस्मरणीय ठरला. कारण संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या कारकिर्दीतील ७१ वे शतक झळकावून इतिहास रचला आहे. लक्षणीय बाब म्हणजे विराटने तब्बल १,०२१ दिवसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक ठोकले आहे. विराट कोहली मागील मोठा कालावधी खराब फॉर्मचा सामना करत होता मात्र अफगाणिस्तानविरूद्धच्या शतकी खेळीमुळे त्याने चाहत्यांना खुशखबर दिली आहे.

दरम्यान, कालच्या सामन्यात भारतीय संघ कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत के.एल राहुलच्या नेतृत्वात मैदानात उतरला होता. नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर विराट कोहली आणि के.एल राहुल यांनी शानदार शतकी भागीदारी नोंदवली. विराटने केलेल्या ६१ चेंडूत नाबाद १२२ धावांच्या जोरावर भारतीय संघाने २० षटकांत २ बाद २१२ धावांपर्यंत मजल मारली. रोहितच्या अनुपस्थितीत के.एल राहुलने देखील दमदार खेळी करत कर्णधारपदाला साजेसे अर्धशतक (४२ चेंडूत ६१ धावा) ठोकले. हे शतक पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिकाला समर्पित असल्याचे विराटने म्हटले.

विश्वचषकातील पहिला सामना खेळण्यासाठी तयार - कोहलीसामना झाल्यानंतर रोहित शर्माने विराट कोहलीची खास मुलाखत घेतली, ज्याचा व्हिडीओ बीसीसीआयने ट्विटच्या माध्यमातून शेअर केला आहे. मुलाखतीत रोहित शर्माने विराटचे अभिनंदन करताना म्हटले, "विराट तुझे खूप खूप अभिनंदन. भारत तुझ्या ७१ व्या शतकाची वाट पाहत होता आणि तू देखील या क्षणाच्या प्रतीक्षेत होतास. तू चांगले शॉर्ट्स खेळलेस याबाबत काय सांगशील?" रोहितने हिंदीत विचारलेल्या प्रश्नांवरून किंग कोहलीने त्यावर एक मजेशीर टिप्पणी देखील केली. "सर्वप्रथम मी खूप शॉक होतो. शतक होईल असे वाटले पण नव्हते. मात्र मला माहिती आहे पुढील दोन महिन्यात मोठ्या चेहऱ्यांविरूद्ध खेळायचे आहे, बलाढ्य संघाशी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जायचे आहे. त्यासाठी आपल्याला तयारी करायची आहे आणि विश्वचषकातील पहिला सामना खेळण्यासाठी मी नक्कीच तयार आहे", अशा शब्दांत किंग कोहलीने विश्वचषकासाठी तयार असल्याचे म्हटले. 

भारताचा मोठा विजयविराट कोहलीच्या शतकाने (नाबाद १२२) भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २ बाद २१२ धावांपर्यंत मजल मारून दिली. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधारपद भूषवणाऱ्या के.एल राहुलनेही अर्धशतकी (६१) खेळी करत विराटला चांगली साथ दिली. परंतु स्पर्धेची सुरूवात अतिशय दिमाखात करणाऱ्या अफगाणिस्तानला मात्र अतिशय कडू शेवटाला सामोरे जावे लागले. अफगाणिस्तानच्या फलंदाजांना २० षटकांत ८ बाद १११ धावाच करता आल्या. भारताच्या भुवनेश्वर कुमारने ४ धावांत ५ बळी टिपत संघाला मोठा विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

 

टॅग्स :एशिया कप 2022भारतीय क्रिकेट संघविराट कोहलीरोहित शर्माबीसीसीआय
Open in App