नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग आपल्या हंगामाकडे कूच करत आहे. आयपीएलच्या 2023च्या हंगामासाठी 23 डिसेंबर रोजी मिनी लिलाव पार पडला. या लिलावात अनेक खेळाडू कोट्यवधी झाले. काही नवख्या भारतीय खेळाडूंना देखील मोठी रक्कम मिळाली. मात्र, या लिलावात काही अनुभवी खेळाडू फ्रँचायझींना आकर्षित करण्यात अपयशी ठरले. यातीलच एक नाव म्हणजे भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज संदीप शर्मा. मला कोणतीच फ्रँचायझी खरेदी करत नाही हे पाहून निराश झालो असून हे धक्कादायक असल्याचे संदीप शर्माने म्हटले.
"नाराज असलेल्या संदीप शर्माने क्रिकेट डॉट कॉमशी संवाद साधताना म्हटले, "मला धक्का बसला असून मी नाराज आहे. मला खरेदी का केले नाही हे मला माहीत नाही. मी ज्या संघासाठी खेळलो त्या संघासाठी मी चांगली कामगिरी केली आहे आणि काही संघ माझ्यासाठी बोली लावतील असे मला वाटले होते. खरं सांगायचे तर, मला याची अपेक्षा नव्हती. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मी चांगली कामगिरी करत आहे. रणजी ट्रॉफीमध्ये शेवटच्या फेरीत मी सात बळी पटकावले. सय्यद मुश्ताक अलीमध्ये मी खूप चांगली कामगिरी केली तरी देखील कोणीही खरेदी केले नाही."
संदीप शर्माने व्यक्त केली खदखद "माझ्या गोलंदाजीत सातत्य राखण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे. मात्र, माझ्या हातात एकच गोष्ट आहे. मी निवड किंवा न निवडण्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. संधी आली तर चांगलेच, नाहीतर मला अजूनही चांगले काम करत राहावे लागेल", अशा शब्दांत नाराज संदीप शर्माने आपली खदखद व्यक्त केली. संदीप शर्माची आयपीएल 2023च्या मिनी लिलावासाठी मूळ किंमत 50 लाख होती. मात्र, त्याला 10 फ्रँचायझीमधून एकही खरेदीदार मिळाला नाही. लक्षणीय बाब म्हणजे तरीदेखील संदीप शर्मा रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून IPL मध्ये खेळू शकतो.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"