Amit Shah Statement On Vinod Kambli : भारताचा माजी कसोटीपटू विनोद कांबळी आणि शतकांचा बादशाह सचिन तेंडुलकर या दोन बालमित्रांची नुकतीच झालेली भेट चांगलीच चर्चेचा विषय ठरली. विनोद कांबळी हा देखील प्रतिभावंत क्रिकेटर होता. पण त्याचं करिअर सचिनसारखं बहरलं नाही.
अमित शाह यांनी एका कार्यक्रमात शेअर केला कांबळीसंदर्भातील खास किस्सा
विनोद कांबळीचा व्हायरल व्हिडिओ चर्चेत आल्यावर तो सध्याच्या घडीला ज्या परिस्थितीत आहे, ते पाहून अनेकांना धक्का बसला. वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन कपिल देव यांच्यापासून ते अगदी लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी विनोद कांबळीला सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा एका कार्यक्रमातील व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अमित शाह यांनी भारताचा माजी कसोटीपटू विनोद कांबळीच्या भेटीतील एक खास किस्सा शेअर केल्याचे पाहायला मिळते.
चढ-उताराच्या काळातील आनंदी क्षण कोणता शाह यांनी विचारला होता प्रश्न
अमित शाह यांचा जो व्हिडिओ समोर आलाय त्यात ते म्हणतात की, "चेन्नईच्या एका क्रिकेटसंदर्भातील कार्यक्रमात मी विनोद कांबळीला भेटलो होतो. आमची भेट झाली त्यावेळी तो क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. पण तो एकेकाळी क्रिकेट जगतातील उत्तम फलंदाज होता. चढ उताराच्या काळात सर्वात आनंदी क्षण कोणता होता? असा प्रश्न मी विनोदला विचारला होता. मला अपेक्षा होती की, तो द्विशतक साजरे केल्याची गोष्ट सांगेन." पण विनोद कांबळी याने याप्रश्नावर अनपेक्षित उत्तर दिले होते.
अमित शाह यांच्या प्रश्नावर विनोद कांबळीनं सांगितली होती मनातली गोष्ट
अमित शाह यांनी विचारलेल्या प्रश्नवार विनोद कांबळी म्हणाला होता की, 'सर, मी अनेक दिग्गजांचा मागे टाकले, अनेक रेकॉर्ड्स मोडले. पण आजही सर्वात सर्वात आनंदी आणि समाधान तेव्हाच मिळते ज्यावेळी मी एखाद्या युवा खेळाडूला बॅकफूटवर खेळायला शिकवतो." अमित शाह यांनी विनोद कांबळीसंदर्भातील शेअर केलेला हा किस्सा क्रिकेटरच्या आयुष्यातील एक वेगळी बाजू दाखवून देणारा आहे.