भारतीय संघाने ऑस्ट्रेलियापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका जिंकली. सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) गुवाहाटी सामना गाजवला. सूर्याने दुसऱ्या ट्वेंटी-२०त २२ चेंडूंत ६१ धावांची खेळी करून चौकार-षटकारांची आतषबाजी केली आणि भारताला २३७ धावांपर्यंत मजल मारून दिली. त्याच्या या खेळीत ५ चौकार व ५ षटकारांचा समावेश होता. या सामन्यात सूर्याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वात कमी चेंडूंत ( ५७३) १०००+ धावांचा विश्वविक्रमही नावावर केला. सूर्यासह या सामन्यात रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली व दिनेश कार्तिक हेही दमदार खेळले.
सूर्यकुमार यादवच्या विकेटला Virat Kohli जबाबदार? नेटिझन्सना झाला राग अनावर, Video
फॉर्मात असलेल्या सूर्यकुमार यादवने आफ्रिकेच्या गोलंदाजांना कुटून काढले. त्याने कागिसो रबाडाच्या एका षटकात २२ धावा चोपल्या आणि ट्वेंटी-२०त १००० धावा पूर्ण केल्या. सर्वात कमी चेंडूंत १००० धावा करण्याचा विक्रमही त्याने नावावर केला. सूर्याने ५७३ चेंडूंत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त १००० + धावा करताना ग्लेन मॅक्सवेलचा ( ६०४) व कॉलिन मुन्रोचा ( ६३५) विक्रम मोडला. त्याने भारतीयांमध्ये सर्वात कमी डावात हा टप्पा ओलांडण्याचा विक्रमात रोहितला मागे टाकले. त्याने ५ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने १८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.
सामन्यानंतर जेव्हा सूर्याच्या फलंदाजाबाबत कर्णधार रोहितला विचारले गेले तेव्हा त्याने मजेशीर उत्तर दिले. आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सूर्याचे फिट असणे हे भारतीय संघासाठी किती महत्त्वाचे आहे, हे रोहितही जाणून आहे. त्यामुळे आता सूर्याला आणखी खेळवणार नसल्याचे सांगताना रोहितने थेट २३ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध त्याला मैदानावर उतरवण्याचा विचार करत असल्याचे तो म्हणाला. तो म्हणाला, मी विचार करतोय की सूर्याला आता आखणी खेळवायचे नाही. थेट आता २३ ऑक्टोबरला त्याला मैदानावर उतरवायचे. त्याला प्रत्येक सामना खेळायचा आहे आणि धडाकेबाज फलंदाजी करायचीय. त्यातच त्याला आनंद मिळतो आणि आम्हालाही त्याला आनंदी ठेवायचे आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"