नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखणाऱ्या भारतीय संघाचे कौतुक केले. ‘प्रत्येक संकटावर मात करीत अव्वल स्थान पटकावण्यास माझा संघ पात्र आहे,’ असे शास्त्रींनी सांगितले. आयसीसीच्या वार्षिक अपडेटनंतरही भारत कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी आहे. या क्रमवारीमुळे शास्त्री खूश आहेत.रवी शास्त्री २०१७ पासून भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. विश्वचषक २०१९ नंतर त्यांचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ वाढविण्यात आला. एकूण १२१ रेटिंग गुणांसह भारत कसोटीत अव्वलस्थानी आहे. टीम इंडियाने २४ सामन्यांत २९१४ गुण मिळविले. विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताविरुद्ध खेळणाऱ्या न्यूझीलंडचे १२० रेटिंग गुण आहेत. त्यांचे १८ कसोटी सामन्यात एकूण २१६६ गुण झाले.भारतीय संघ डब्ल्यूटीसी अंतिम फेरीच्या लढतीत न्यूझीलंडविरुद्ध चमकदार कामगिरी करेल, अशी आशा आहे. भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंतच्या सत्रात शानदार कामगिरी केलेली आहे.
- शास्त्री यांनी आपल्या टीम इंडियासाठी एक ट्वीट केले. ते म्हणाले, ‘संघाने प्रथम क्रमांकाचा मुकुट मिळविण्यासाठी दृढनिश्चय आणि एकाग्रतेचे उत्तम उदाहरण सादर केले. - ही अशी एक गोष्ट आहे, जी खेळाडूंनी स्वतःच्या मेहनतीमुळे मिळविली आहे. मध्ये काही नियम बदलले. परंतु भारतीय संघाने आपल्या मार्गातील प्रत्येक अडथळा दूर केला. - माझे खेळाडू कठीण काळात कठोर क्रिकेट खेळले. मला या बिनधास्त संघाचा मोठा अभिमान वाटतो.’