Virat Kohli : भारतीय संघाचा सुपरस्टार, जगातील नंबर वन फलंदाज विराट कोहली आणखी एक ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्याची तयारी करतोय... १६-१७ वर्षांच्या कारकिर्दीत विराटने अनेक विक्रम नावावर केले आहेत, वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक पन्नास शतकांचा विक्रमही त्याने मागील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत नावावर केला.. आता त्याला कारकीर्दिच्या शेवटच्या टप्प्यात भारतासाठी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकायचा आहे आणि आयपीएल २०२४ मधील कामगिरीवरून त्याचा हा निर्धार पक्का झालेला दिसतोय. विराट कोहलीने IPL 2024 मध्ये ७ सामन्यांत सर्वाधिक ३६१ धावा केल्या आहेत आणि त्यात १ शतक व २ अर्धशतकांचा समावेश आहे.
विराट हा अनेक युवकांसाठी प्रेरणास्त्रोत आहे... त्याच्यासारखं आपल्यालाही बनायचंय असे अनेकांना वाटलं. ''भारतातील युवक हे विराट कोहलीच्या विचारसरणीतले आहेत. त्यांना खरोखरच जागतिक स्तरावर अधिक विस्तार करायचा आहे. मी जगात कोणापेक्षाही कमी नाही, असा आत्मविश्वास त्यांच्यात आहे,''असं नुकतंच एका मुलाखतीत RBI चे माजी प्रमुख रघुराम राजन यांनी म्हटले होते.
युवक ज्याला आदर्श मानतात, अशा विराटचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि तो ऐकल्यावर आपल्या अंतरात्म्याला भिडेल, हे नक्की. तो म्हणाला, ''मी ज्या पोझिशनमध्ये आहे. तिथून मी संघर्ष आणि त्याग असे शब्द वापरू शकत नाही. माझ्यासाठी संघर्ष आणि त्याग असं काही नाही. ज्याला दोन वेळचं जेवण मिळत नाही, त्याचा स्ट्रगल असतो... तुम्ही तुमच्या मेहनतीला रंगवून सांगत असाल ते चुकीचे आहे. तुम्हाला कोणी सांगत नाही जिमला जा, पण तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं पोट भरायचं आहे. मी स्वतःला भाग्यवान मानतो की जे मला करायचं होतं ते मला करायला मिळालं. मी क्रिकेट खेळतो, जी माझी आवड आहे. ''
५ नोव्हेंबर १९८८ रोजी दिल्लीत जन्मलेल्या विराट कोहलीने वयाच्या नऊव्या वर्षी बॅट उचलली. अभ्यासात तो फारसा हुशार विद्यार्थी नव्हता, पण क्रिकेटच्या खेळपट्टीवर जाताच त्याच्यात एक वेगळीच ऊर्जा दिसून आली. वयाच्या अवघ्या ११-१२ व्या वर्षी त्याने दिल्ली क्रिकेटमध्ये नाव कमावले होते. दिल्ली आणि कर्नाटक यांच्यात रणजी ट्रॉफी सामना सुरू असताना १८ वर्षीय विराटच्या वडिलांचे निधन झाले. सकाळी वडिलांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर तरुण विराट मैदानात परतला आणि फलंदाजी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. वडील गमावल्यानंतर विराट मानसिकदृष्ट्या आणखी मजबूत झाला.