श्रीलंका : निदाहास ट्रॉफीतील प्रकरणानंतरआपल्यावर आयसीसी कडक कारवाई करेल, या भितीने बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनने पलटी मारली आहे. जेव्हा मैदानात गोंधळ सुरु होता तेव्हा शकिब मैदानावरील फलंदाजांना पेव्हेलियनमध्ये बोलवत असल्याचे साऱ्यांनी पाहिले आहे. पण आता मात्र " तो मी नव्हेच..." असं म्हणत शकिबने पलटी मारली आहे.
सामन्याच्या शेवटच्या षटकात जे नाट्य घडलं ते काही चाह्त्यांच्या पचनी पडलेले नाही. अखेरच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बांगलादेशचा मेहदी हसन धावबाद झाला. हा चेंडू षटकातील दुसरा बाउन्सर असतानाही पंचांनी नो-बॉल का दिला नाही, असा आक्षेप घेत बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसननं हुज्जत घातली. त्यानं आपल्या फलंदाजांना सामना सोडून माघारी यायला सांगितलं. त्यामुळे पाच मिनिटं खेळ थांबला. सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी हा वाद मिटवला. त्याचवेळी, बांगलादेशचे फलंदाज मैदानावर गेले नाहीत, तर संघ अपात्र ठरेल आणि श्रीलंका अंतिम फेरीत जाईल, याची जाणीव बांगलादेशचे व्यवस्थापक खालिद महमूद यांनी यांनी करून दिली. त्यामुळे सामना पुन्हा सुरू झाला आणि बांगलादेशने थरारक विजय मिळवला.
" मैदानात जेव्हा सारा गोंधळ सुरु होता तेव्हा मी खेळाडूंनी पेव्हेलियनमध्ये बोलावले नाही. त्यांना मी सामना पूर्ण करा, अशी सुचना करत होतो. काही लोकांनी माझ्या या गोष्टीचा फारच चुकीचा अर्थ काढला. त्यामुळे माझ्यावर टीकाही झाली. पण मी हे सांगू इच्छितो की, मी खेळाडूंना माघारी बोलवत नव्हतो. ते खेळभावनेला शोभलं नसतं, " असं शकिबनं सांगितलं.
बांगलादेशच्या खेळाडूंनी जोरा केला, त्यामुळे दोन्ही देशांतील संबंध बिघडणार नाहीत, असंही शकिबला वाटतं. याबद्दल तो म्हणाला की, " बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध आहेत. जे काही घडले त्याचे मी समर्थन करत नाही. काही वेळा चुका होतात. पण या चुकांमुळे दोन्ही देशांतील संबंध मात्र नक्कीच बिघडणार नाहीत. आम्ही नेहमीच श्रीलंकेला सर्वतोपरी मदत करण्यासाठी सज्ज असू "