दाम्बुला: ‘अपयशातून बरेच काही शिकायला मिळते. खराब कामगिरीमुळे संघाबाहेर बसावे लागले हे देखील मी विसरलेलो नाही. अपयशातूनच यशाचा मार्ग गवसतो.’ भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन याने श्रीलंकेविरुद्ध दमदार शतकी खेळीनंतर मंगळवारी भावनांना वाट मोकळी करून दिली. दाम्बुलामध्ये श्रीलंकेविरु द्ध पहिल्या वन डेत शिखरने झंझावाती शतक ठोकले. श्रीलंका दौºयातील धवनचे हे तिसरे शतक. याआधी कसोटी सामन्यात त्याने दोन शतके झळकावली होती. अपयश मागे टाकून यशोखिरावर पोहोचलेला धवन म्हणाला,‘अपयशातून आपल्याला ब-याच गोष्टी शिकायला मिळतात. कारकिर्दीत चढ-उताराच्या परिस्थितीने मला खूप काही शिकवले. मी यापूर्वी कठीण परिस्थितीतून गेलो आहे. मैदानातील अपयशाने मी निराश होत नाही, तसेच याबद्दल अधिक विचार करत नाही. खेळात चांगल्या कामगिरीसाठी माझा सराव सुरूच ठेवतो.’ तो पुढे म्हणाला ,‘जेव्हा मी खराब फॉर्ममध्ये असतो तेव्हा खेळावर लक्ष केंद्रित करण्यावर भर देतो.
चांगली खेळी करीत असताना देखील मी हा मंत्र जपतो. ही गोष्ट चढ-उताराच्या काळात माझ्यासाठी फायदेशीर ठरते.’ सामनावीराचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर धवनने दिलेली प्रतिक्रि या त्याच्या यशाचे गुपित उलगडणारी होती. गेल्या तीन महिन्यांपासून शिखर धवन सातत्यपूर्ण कामिगरी करीत आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत त्याने लक्षवेधी कामगिरी केली. कसोटीमध्ये दमदार खेळीनंतर रविवारी श्रीलंकेविरु द्ध पहिल्या वन डेत धवन चांगलाच बरसला. या सामन्यात त्याने ९० चेंडूत २० चौकार आणि तीन षटकारांसह १३२ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने श्रीलंकेला नऊ गडी राखून सहज पराभूत केले. श्रीलंकेविरु द्धच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.
लंकेच्या युवा खेळाडूंबद्दल सहानुभूती... धवनने श्रीलंकेच्या युवा खेळाडूंबद्दल सहानुभूती दर्शविली आहे. तो म्हणाला,‘ लंकेचा संघ युवा असून परिवर्तनाच्या स्थितीत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परिपक्व होण्यासाठी अनुभव हवा असतो. अनुभवातून सर्व खेळाडू बलाढ्य बनतील, यात शंका नाही.’ लंका संघातील गोलंदाज सर्वांत कमकुवत असल्याचे वाटते का, असे विचारताच तो म्हणाला,‘ इतका कठोर प्रहार योग्य नाही. डावखुरा विश्वा फर्नांडो चांगला मारा करतो. चॅम्पियन्स ट्रॉफीत लंकेने आम्हाला धूळ चारली हे विसरून चालणार नाही.