Join us  

IPL 2023: "7.5 लाख डॉलर्स म्हणजे किती हे माहित नव्हतं", रोहितनं सांगितला IPLमधील मजेशीर किस्सा

rohit sharma ipl: जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात इंडियन प्रीमिअर लीग आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 12:08 PM

Open in App

mumbai indians । मुंबई : जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात इंडियन प्रीमिअर लीग (IPL) आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. आयपीएल 2023 (IPL 2023) सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशातच या मोठ्या ट्वेंटी-20 लीगसाठी अनेक स्तरातून जोरदार प्रचार केला जात आहे. याचाच एक भाग म्हणजे स्टार स्पोर्ट्सने जारी केलेला एक व्हिडीओ, ज्यामध्ये सर्व नामांकित क्रिकेटपटू आयपीएलबद्दल मजेदार किस्से सांगताना दिसत आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने देखील त्याच्या पहिल्या आयपीएलच्या आठवणींना उजाळा दिला. पहिल्या हंगामात हिटमॅनला मिळालेल्या रकमेबद्दल त्याने एक हास्यास्पद खुलासा केला आहे.

दरम्यान, IPL चा पहिला हंगाम 2008 मध्ये खेळला गेला होता. त्यावेळी 20 वर्षीय रोहित शर्माला हैदराबादची फ्रँचायझी टीम डेक्कन चार्जर्सने 7.5 लाख डॉलर्स एवढ्या रकमेमध्ये आपल्या ताफ्यात घेतले होते. रोहितला आयपीएलच्या पहिल्या हंगामात भारतीय रकमेनुसार 4.8 कोटी मिळाले होते. पहिल्या हंगामात डेक्कन चार्जर्सकडून खेळताना रोहित शर्माने शानदार फलंदाजी केली. त्‍याने चार्जर्सकडून खेळताना 3 हंगामात 1170 धावा केल्या होत्या. तसेच 2009 मध्‍ये रोहित शर्मा विजेतेपद पटकावण्‍याऱ्या संघाचा एक भाग होता. पण 2011 मध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्माचा आपल्या संघात समावेश केला. तेव्हापासून तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 5 वेळा विजेतेपद पटकावले आहे. 

रोहितनं सांगितला मजेशीर किस्सा रोहित शर्माने त्याच्या पहिल्या आयपीएलमधील एक मजेशीर किस्सा सांगून चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. आयपीएलच्या आठवणींना उजाळा देताना रोहितने म्हटले, "आयपीएलच्या पहिल्या हंगामात मला 7.5 लाख डॉलर्स किती आहेत हे देखील माहित नव्हते. लिलावासारखी घटना आमच्या बाबतीत कधी घडलीच नव्हती, आम्ही हे याधी पाहिले देखील नव्हते. जेव्हा मला खरेदी केले तेव्हा मी एकच विचार करत होतो की मला कोणती तरी एक कार घ्यायची आहे, ज्याला पूर्ण करण्याचा मी विचार करत होतो. त्यावेळी मी फक्त 20 वर्षांचा होतो." आयपीएल 2023 मध्ये रोहित शर्माच्या कर्णधारपदाला 10 वर्षे पूर्ण होत आहेत. 2013 मध्ये त्याने पहिल्यांदा मुंबईचे कर्णधारपद भूषवले, त्यानंतर त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सच्या संघाने इतिहास रचला. 

आगामी IPL हंगामासाठी मुंबई इंडियन्सचा संघ - रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, जसप्रीत बुमाराह , जोफ्रा आर्चर, टीम डेव्हिड. डेवॉल्ड ब्रेव्हिस, हृतिक शोकिन, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, तिलक वर्मा, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेया, आकाश माधवाल, त्रिस्तान स्तब्स, रमणदीप सिंग, कॅमेरून ग्रीन, झाय रिचर्डसन, राघव गोयल. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

 

टॅग्स :आयपीएल २०२२रोहित शर्मामुंबई इंडियन्सइंडियन प्रीमिअर लीग
Open in App