नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा याने श्रीलंकेविरुद्ध झालेल्या दुसऱ्या वनडेत द्विशतक फटकावत तीन द्विशतके फटकावणार पहिला फलंदाज होण्याचा मान पटकावला होता. या विक्रमी खेळीनंतर रोहितने आपल्या खेळाविषयी भाष्य करताना मी काही धोनी किंवा ख्रिस गेलप्रमाणे ताकदवान फलंदाज नाही. त्यामुळे अचूक टायमिंग साधून चेंडूल सीमापार करण्यावर लक्ष केंद्रित करतो, असे सांगितले.मोहालीत झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर बीसीसीआयने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री हे रोहित शर्माला प्रश्न विचारत आहेत, तर रोहित शर्मा या प्रश्नांना सफाईदारपणे उत्तरे देत आहेत. यावेळी तीन द्विशतकांपैकी कुठले द्विशतक तुला सर्वात महत्त्वाचे वाटते असे विचारले असता रोहित म्हणाला,"मला वाटतं कुठल्याही एका द्विशतकाची सर्वात आवडीचे म्हणून निवड करणे कठीण ठरेल, कारण तिन्ही द्विशतके माझ्यासाठी खास आहेत. तसेच प्रत्येक वेळी कठीण प्रसंगीच मी द्विशतकी खेळी साकारली आहे."यावेळी स्वत:च्या फलंदाजीविषयी बोलताना रोहित म्हणाला,"तुम्हाला माहित असेलच की माझे बलस्थान हे चेंडूला वेळ पाहून खेळणे हे आहे. मी त्यावरच लक्ष केंद्रित करतो, मी काही धोनी किंवा ख्रिस गेलप्रमाणे नाही हे मला ठावूक आहे. त्यामुळे मी नेहमी टायमिंगवर विश्वास ठेवतो. या सामन्यात सुद्धा मी तेच केले." रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा डबल धमाका करताना मोहालीत झालेल्या दुसऱ्या वनडेमध्ये चौकार षटकारांची बरसात करत रोहितने एकदिवसीय क्रिकेटमधील तिसरे आणि श्रीलंकेविरुद्धचे दुसरे द्विशतक फटकावले होते. या खेळीदरम्यान रोहितने अनेक विक्रमांना गवसणी घातली. सावध सुरुवात करणाऱ्या खेळपट्टीवर जम बसल्यावर लंकेच्या गोलंदाजांची धुलाई केली.115 चेंडूत शतक पूर्ण केल्यानंतर रोहितने टॉप गिअर टाकला. मग पुढच्या 100 धावांसाठी मात्र त्याने अवघे 36 चेंडू घेतले. यादरम्यान त्याने 13 चौकार आणि 12 षटकार ठोकले. 2013 मध्ये रोहित शर्माने कांगारुंविरुद्ध कारकिर्दीतील पहिलं द्विशतक झळकावले होते. त्यावेळी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 धावांची खेळी साकारली होती. 13 नोव्हेंबर 2014 या दिवशी सलामीवीर रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध धमाकेदार खेळी करताना 264 धावा फटकावत वनडेतील दुसरे द्विशतक झळकावले होते. श्रीलंकेविरुद्धची ही खेळी रोहितच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- मी काही धोनी, गेल नाही, त्यामुळे टायमिंगवर करतो लक्ष केंद्रित - रोहित शर्मा
मी काही धोनी, गेल नाही, त्यामुळे टायमिंगवर करतो लक्ष केंद्रित - रोहित शर्मा
भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा याने श्रीलंकेविरुद्ध झालेल्या दुसऱ्या वनडेत द्विशतक फटकावत तीन द्विशतके फटकावणार पहिला फलंदाज होण्याचा मान पटकावला होता. या विक्रमी खेळीनंतर रोहितने आपल्या खेळाविषयी बोलताना...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 3:32 PM