Virat Kohli, IND vs SL: कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला श्रीलंकेत मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय संघाचा श्रीलंकेविरूद्धच्या वनडे मालिकेत २-० असा पराभव झाला. पहिला सामना बरोबरीत सुटल्यानंतर दुसरा सामना श्रीलंकेने ३२ धावांनी जिंकला होता. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी अतिशय वाईट कामगिरी केल्याने टीम इंडियाला ११० धावांनी मोठा पराभव स्वीकारावा लागला. अविष्का फर्नांडोच्या ९६ धावांच्या बळावर श्रीलंकेने ७ बाद २४८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा संपूर्ण डाव १३८ धावांतच गुंडाळला गेला. भारताचा रनमशिन विराट कोहली या दौऱ्यावर पुरता फ्लॉप ठरला. त्याच्या या अपयशावर भारतीय माजी क्रिकेटर आणि समालोचक आकाश चोप्रा याने प्रतिक्रिया दिली.
विराट पहिल्या वनडे सामन्यात ३२ चेंडूत २४ धावा करून पायचीत झाला. दुसऱ्या सामन्यातही विराट १९ चेंडूत १४ धावा करून पायचीत झाला. तर तिसऱ्या सामन्यातही तो १८ चेंडूत २० धावा करुन पायचीत झाला. या मुद्द्यावरूनच आकाश चोप्राने आपले मत मांडले. "विराट कोहली तीनही सामन्यांत LBW झाला. तिन्ही वेळा त्याला स्पिनर्सने बाद केले. असा प्रकार याआधी विराटसोबत शेवटचा कधी घडला होता हे मला आठवतच नाही. विराट कोहलीला चेंडू समजतच नव्हता. तो चुकीच्या लाईनवर खेळत होता. प्रत्येक वेळी बाद झाल्यावर त्याने DRS चा आधार घेतला पण तरीही काही फरक पडला नाही. या मालिकेत विराट आपल्या खेळाची छाप सोडूच शकला नाही," असे आकाश चोप्रा म्हणाला.
"श्रेयस अय्यरच्या बाबतीतही असाच काहीसा प्रकार घडला. अय्यर हा स्पिन गोलंदाजीच्या विरोधात उत्तम फलंदाज मानला जातो. पण त्यालाही स्पिन खेळता आला नाही. स्पिनर्सवर आक्रमण करण्याचा त्याला प्रयत्नही करता आला नाही. तो दोन वेळा स्पिनर्सविरोधात खेळताना बाद झाला तर एकदा वेगवान गोलंदाजाने त्याला माघारी धाडले. आपल्या संघातील स्पिनविरोधात चांगले खेळणारे फलंदाज इतके वाईट का खेळले असावेत, ही गोष्ट समजण्या पलिकडली आहे," असेही आकाश चोप्रा म्हणाला.
दरम्यान, रोहिच शर्माने नेहमीप्रमाणे दमदार सुरुवात केली होती. आपल्या ३५ धावांच्या खेळीत त्याने ६ चौकार आणि १ षटकार खेचला होता. पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. शुबमन गिल अवघ्या ६ धावांवर बाद झाल्याने विराटला पाचव्या ओव्हरलाच मैदानात यावे लागले. त्यामुळे विराट-रोहित जोडीकडून साऱ्यांना खूप अपेक्षा होत्या. पण रोहित झेलबाद झाला. त्यानंतर विराटवरील जबाबदारी आणखी वाढली. पण तो १८ चेंडूत ४ चौकारांसह २० धावा काढून माघारी परतला. इतर फलंदाजीनाही निराशाच केली. त्यामुळे भारताचा १९९७ नंतर पहिल्यांदाच श्रीलंकेने वनडे मालिकेत पराभव केला.