नवी दिल्ली - मी अर्जुनमध्ये पुढचा सचिन तेंडुलकर बघत नाही. त्याने अर्जुन तेंडुलकर म्हणूनच स्वत:ची ओळख निर्माण करावी असे मत भारताचे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी व्यक्त केले आहे. नोएडामध्ये आयोजित केलेल्या ऑटो एक्सपोमध्ये आलेल्या सचिन तेंडुलकरने टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. त्यावेळी सचिनने कार, स्वच्छ भारत, क्रिकेटच्या विषयावर मनमोकळया गप्पा मारल्या.
क्रिकेटर म्हणून अर्जुनची तयारी कशी सुरु आहे या प्रश्नावर सचिन म्हणाला कि, माझ्या वडिलांनी मला स्वातंत्र्य दिलं तसंच मी अर्जुनला आयुष्यात त्याला जे काय करायचं आहे त्यासाठी स्वातंत्र्य दिलं आहे. फक्त त्याने त्यामध्ये सर्वोत्तम बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुमचा मुलगा म्हणून त्याच्यावर दबाव वाढतो का ? या प्रश्नावर सचिन म्हणाला कि, या गोष्टी असणारच पण त्याच सर्व लक्ष खेळावर केंद्रीत असलं पाहिजे.
एक पालक म्हणून मला हीच अपेक्षा आहे. तुलना तर होणारच. मला माझ्या वडिलांकडून एक गोष्ट शिकायला मिळाली ती म्हणजे तुम्हाला जे काम मिळेल त्यावर पूर्ण लक्ष द्या. बाकी सर्व घडतच राहिल. वडिलांनी मला स्वातंत्र्य दिले पण स्वातंत्र्यबरोबर जबाबदारीही येते. त्याने सचिन म्हणून नव्हे तर अर्जुन तेंडुलकर म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करावी असे सचिनने सांगितले.
कारच्या आवडीबद्दल बोलताना सचिन म्हणाला कि, लहान असताना मी आई-वडिलांबरोबर टॅक्सीमधून प्रवास करायचो त्यावेळी ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसायचो. त्यावेळी ड्रायव्हर गाडी कशी चालवतो, गेअर कसे बदलतो याचे मी निरीक्षण करायचो. त्यानंतर मी घराच्या गॅलरीमध्ये उभे राहून गाडयांचे निरीक्षण करायचो. पुढे मी गाडयांचे व्हिडिओ पाहू लागलो आणि गाडयांबद्दलचे माझे आकर्षण प्रचंड वाढले. मला गाडया प्रचंड आवडतात असे सचिन म्हणाला. इलेक्ट्रीक कारसच्या वापराबद्दल बोलताना सचिन म्हणाला कि, आपण इलेक्ट्रीक कारसबद्दल फक्त बोलत आहोत पण जग त्या दिशेने चालले आहे. आपणही जास्तीत जास्त इलेक्ट्रीक कारसचा वापर केला पाहिजे.