Rishabh Pant on Rohit Sharma, Team India: भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी२० वर्ल्डकप जिंकला. महेंद्रसिंह धोनीनंतर तब्बल १४ वर्षांनी भारतीय संघाला टी२० वर्ल्डकप जिंकता आला. स्पर्धेतील पहिल्या सामन्यापासून ते शेवटच्या सामन्यापर्यंत भारतीय संघातील सर्वच खेळाडूंनी आपली चमक दाखवली. कर्णधार रोहित शर्माने सलामीला दमदार सुरुवात करून देत भारतीयांना बॅटिंग मेजवानी दिली. पण रोहितच्या नेतृत्वशैलीची सर्वाधिक चर्चा रंगली. रोहित शर्मा कर्णधार म्हणून सर्वोत्तम कसा आहे, याचे उदाहरण त्याने दाखवून दिले. पण रोहित शर्माबद्दल रिषभ पंतने मात्र एक विधान केले आहे.
रोहित शर्मा हा प्रचंड विसराळू स्वभावाचा आहे ही बाब साऱ्यांनाच माहिती आहे. या रोहितच्या या स्वभावामुळे तो अनेकदा काही ना काही विसरतच असतो. कधी तो पासपोर्ट हॉटेलमध्ये विसरतो, कधी संघात कोण-कोण आहे ती यादी विसरतो तर कधी शब्दच विसरतो. 'तू 'हे' कर, तू 'त्याला' सांग, 'ते' घेऊन ये' अशा प्रकारे रोहित बोलत असतो. त्यामुळे अनेकदा बरेच जण गोंधळात पडतात. त्याचबाबत तन्मय भटच्या यूट्युब चॅनेवरील चर्चेत रिषभ पंतला विचारण्यात आले. त्यावेळी तो म्हणाला, "रोहित भाई शब्द विसरतो हे खरं आहे. त्याला काय म्हणायचं आहे हे समजून घेणं खूप कठीण असते. मैदानात असेल तर खेळाच्या अनुषंगाने त्याला काय म्हणायचंय याचा अंदाज लावता येतो. मैदानात ठिक आहे पण मैदानाबाहेर मात्र तो काय बोलतो काहीच कळत नाही."
माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याबाबतही पंत खुलेपणाने बोलला. "रवी शास्त्रींसोबत माझं नातं खूप छान होतं. त्यांनी आम्हाला स्वातंत्र्य दिलं आणि खेळ समजावून सांगितला. कुणी आडकाठी केलेल मला मूळातच आवडत नाही. ऑफस्पिनरला कसे खेळावे यावर आमची बरीच चर्चा झाली आणि त्यांच्याच सांगण्यावरून मी रिव्हर्स स्वीप खेळायला सुरुवात केली," असे पंत म्हणाला.