Riyan Parag News : राजस्थान रॉयल्सचा स्टार फलंदाज रियान पराग सध्या चर्चेत आहे. कोणत्याही परिस्थितीत भारतीय संघात खेळणार असल्याचे त्याचे विधान चर्चेत असतानाच आता त्याने आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. परागने सध्या सुरू असलेल्या ट्वेंटी-२० विश्वचषकातील टॉप-४ संघांबद्दल भविष्यवाणी करताना एक अनोखे विधान केले. रियान म्हणाला की, मला विश्वचषक पाहण्यात अजिबात रस नाही. जेव्हा मी विश्वचषकाच्या संघाचा भाग असेन तेव्हा टॉप-४ संघांबद्दल बोलेन. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये परागने भारतीय संघ उपांत्य फेरी गाठेल असे संकेत दिले. पण, त्याने टॉप-४ संघांबद्दल भाष्य करणे टाळले.
"मी बोलतो आहे ते एक वेगळे उत्तर असू शकते, परंतु अगदी प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास, मला विश्वचषक देखील पाहायचा नाही. अखेर कोण जिंकते हे मी नक्की बघेन आणि मला आनंद होईल. मी जेव्हा विश्वचषक खेळेन तेव्हा मी अव्वल चार आणि त्या सर्वांचा विचार करेन", असे परागने सांगितले. तो 'भारत आर्मी'शी बोलत होता. अलीकडेच परागने दावा केला होता की, काहीही झाले तरी तो एक दिवस भारताकडून खेळताना दिसेल.
दरम्यान, २ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वेविरूद्ध द्विपक्षीय मालिका खेळेल. या मालिकेत रियानला संधी मिळेल असे त्याला वाटते. तो म्हणाला की, पुढचा दौरा असो की मग सहा महिने की मग एक वर्ष. मी कधी भारतीय संघातून खेळेन याबद्दल जास्त विचार करत नाही. हे निवडकर्त्यांचे काम आहे.
आयपीएल २०२४ मध्ये रियान सुस्साटरियान परागने २०१९ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. पण, आयपीएल २०२४ च्या आधी त्याला एकदाही एका हंगामात २०० हून अधिक धावा करता आल्या नाहीत. त्याच्या नावावर केवळ दोन अर्धशतकांची नोंद होती. पण, आयपीएलच्या सतराव्या हंगामात चमकदार कामगिरी करताना त्याने आपली छाप सोडली. या हंगामात १५ सामन्यांत त्याने १४८.२२ च्या स्ट्राईक रेटने ५७३ धावा केल्या, ज्यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश आहे. ८४ नाबाद ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली. रियानने आयपीएल २०२४ मध्ये ४० चौकार आणि ३३ षटकार ठोकले.