Rohit Sharma R Ashwin, IND vs SL: भारतीय संघाने नुकतीच श्रीलंकेविरूद्धची पहिली कसोटी मोठ्या फरकाने जिंकली. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५७४ धावा कुटल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला डाव १७८ वर तर दुसरा डाव १७४ धावांवर आटोपला. त्यामुळे भारताने एक डाव आणि २२२ धावांनी सामना खिशात घातला. या सामन्यात रविंद्र जाडेजाने नाबाद १७५ धावा आणि ९ बळी अशी अष्टपैलू कामगिरी केली. आर अश्विननेदेखील ६१ धावा आणि ६ बळी अशी उल्लेखनीय कामगिरी केली. सामन्यानंतर रोहितने पत्रकारांशी संवाद साधताना आर अश्विनचं तोंडभरून कौतुक केलं. Pakistan चा माजी क्रिकेटर रशीद लतीफ याला त्याची स्तुती पटली नव्हती. पण रोहितच्या विधानावर आता अश्विनने प्रतिक्रिया दिली आहे.
"रोहितने माझी इतकी स्तुती केल्यानंतर मी त्याला जाऊन काय बोलावं हेच मला कळत नव्हतं. कारण एखाद्याने माझी प्रशंसा केली तर त्यावर प्रतिक्रिया कशी द्यायची हेच मला कळत नाही. काही वेळा मी भावूक होतो. जेव्हा मी भावूक होतो, तेव्हा माझ्या भावना शब्दात व्यक्त करणं मला खरंच जमत नाही. रोहितने पत्रकारांसमोर माझ्यावर कौतुकाचा वर्षाव केला. मी आज सकाळपर्यंत काय प्रतिक्रिया द्यावी हेच विचार करत होतो. अखेर ब्रेकफास्ट हॉलमध्ये मी रोहितला भेटलो तेव्हा मी त्याला इतकंच म्हणू शकलो की तू माझ्याबद्दल जे बोललास ते खूपच छान वाटलं (so sweet of you)", असं अश्विनने मुलाखतीत सांगितले.
"माझ्या दृष्टीने अश्विन ऑल टाईम ग्रेट आहे. तो इतकी वर्षे खेळत आहे आणि देशासाठी परफॉर्मन्स देत आहे. त्याने मोक्याच्या क्षणी अनेक मॅच-विनिंग परफॉर्मन्स दिले आहेत. त्यामुळे माझ्यासाठी तो ऑल टाईम ग्रेट आहे. लोकांचे मुद्दे वेगळे असू शकतात. त्यांचा दृष्टिकोनही वेगळा असू शकतो. पण मी जे पाहिलंय त्यात मला अश्विन हा सर्वकालीन महान खेळाडू वाटतो", असं रोहित पहिल्या कसोटीनंतर पत्रकार परिषदेत म्हणाला होता.
पण पाकिस्तानच्या रशिद लतीफने मात्र या विधानावर नाराजी व्यक्त केली होती. "अश्विन हा महान गोलंदाज आहे यात शंका नाही. पण तो भारतातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आहे. परदेशातील परिस्थितीत अश्विनबद्दल रोहितने जे मत मांडलंय त्याच्याशी मी सहमत नाही. कारण अनिल कुंबळे हा खूप चांगला स्पिनर होता. त्याने परदेशातही खरोखरच चांगली कामगिरी केली. जाडेजानेही चांगली कामगिरी केली आहे", असं लतीफने म्हणाला होता.