कोलकाता : मैदानावर आपल्या आक्रमक वर्तनामुळे अनेकदा अडचणीत सापडलेला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा म्हणाला की, मला लवकर राग येत नाही, पण गोलंदाज म्हणून त्या क्षणी अशी कृती घडते.यंदा इंग्लंडविरुद्ध स्थानिक कसोटी मालिकेतील अखेरच्या सामन्यात २५ वर्षीय या गोलंदाजाला (गेल्या २४ महिन्यात ४ डिमेरिट गुण असल्यामुळे) निलंबित करण्यात आले होते. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात जो रुटला बाद केल्यानंतर जल्लोष करताना रबाडा इंग्लंडच्या या कर्णधाराच्या फार जवळ पोहोचला होता.
इंडियन प्रीमिअर लीगचा त्याचा संघ दिल्ली कॅपिटल्ससोबत इन्स्टाग्राम चॅटमध्ये शुक्रवारी रबाडा म्हणाला, ‘अनेकांना वाटते माझ्यात संयम नाही, पण मला असे वाटत नाही. मी केवळ भावनेच्या भरात असे करतो. या व्यतिरिक्त तुम्ही स्लेजिंगबाबत बोलत असाल तर तो खेळाचा भाग आहे. प्रत्येक वेगवान गोलंदाज ते करतो. कुठलाही वेगवान गोलंदाज फलंदाजासोबत (सामन्यादरम्यान) चांगले वर्तन ठेवत नाही. याचा अर्थ तुम्ही वैयक्तिक किंवा कुटुंबाबाबत टिपण्णी करायला हवी, असे नाही.’