आशिया चषक २०२३ स्पर्धेत शनिवारी भारत-पाकिस्तान हा महामुकाबला होणार आहे. विराट कोहलीने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानी गोलंदाजांची केलेली धुलाई, आजही चाहत्यांच्या चांगली लक्षात आहे. त्यामुळे विराटची दहशत पाकिस्तानी गोलंदाजांवर असणे साहजिक आहे. पण, ते भारताच्या सुपरस्टारला टक्कर देण्यासाठी सज्ज आहेत. याचवेळी पाकिस्तानचा गोलंदाज शादाब खान ( Shadab Khan) याने एक प्रांजळ कबुली दिली आहे.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील विराटच्या खेळीबद्दल बोलताना शादाब म्हणाला, तो निश्चितच जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी तुम्हाला खूप नियोजन करावे लागेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये माईंड गेम असतात, कारण त्या पातळीपर्यंत पोहोचण्याचे कौशल्य तुमच्याकडे नक्कीच असते. विराट कोहली ज्या प्रकारचा फलंदाज आहे. त्याने वर्ल्ड कप स्पर्धेतील शेवटच्या सामन्यातही आमच्याविरुद्ध ज्याप्रकारे कामगिरी केली आहे, मला वाटत नाही की, जगातील इतर कोणत्याही फलंदाजाने अशा परिस्थितीत आमची बॉलिंग लाइनअपविरुद्ध अशी कामगिरी केली असती. तो कोणत्याही टप्प्यावर आणि कधीही दमदार कामगिरी करू शकतो.
स्टार स्पोर्ट्सशी एका खास संवादात, पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने आगामी आशिया चषक २०२३ साठी त्याच्या धोरणात्मक दृष्टिकोनाची रूपरेषा सांगितली. तो म्हणाला, “माझ्या मते, माझा गेम प्लॅन सोपा आहे. प्रत्येक सलामीवीराला माझा गेम प्लॅन माहीत आहे. नेहमीप्रमाणेच सलामीवीरांना बाद करून फलंदाजी करणाऱ्या संघावर दडपण आणणे हे ध्येय आहे. मधल्या फळीला नवीन चेंडूविरुद्ध खेळण्याची सवय नसते. त्यामुळे नवीन चेंडूचा सामना करण्यासाठी मधल्या फळीवर खूप दडपण असते.”
विराट कोहलीकडून पाकिस्तानी गोलंदाजांचे कौतुक
विराट म्हणाला, “गोलंदाजी ही त्यांची ताकद आहे असे मला वाटते. त्यांच्याकडे काही खरोखर प्रभावी गोलंदाज आहेत जे त्यांच्या कौशल्याच्या आधारे कधीही सामना फिरवू शकतात. त्यामुळे त्यांचा सामना करण्यासाठी तुम्ही सर्वोत्तम प्रयत्न केले पाहिजे.''
“ प्रत्येक दिवस, प्रत्येक सराव सत्र, दरवर्षी, प्रत्येक हंगामात मी फक्त माझा खेळ कसा चांगला करू शकतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. यामुळेच मला इतके दिवस चांगले खेळण्यात आणि माझ्या संघासाठी कामगिरी करण्यात मदत झाली. त्या मानसिकतेशिवाय तुम्ही सातत्यपूर्ण कामगिरी करू शकता, असे मला वाटत नाही. मला असे वाटते की मी दररोज चांगल्यासाठी प्रयत्न करतो. मी माझ्या संघाला या स्थानावरून कसे जिंकू? हे मला एक चांगला खेळाडू बनवेल किंवा मी अशा प्रकारे कामगिरी केल्यास माझा संघ अधिक चांगल्या स्थितीत येईल,''असेही विराटने सांगितले.