BCCI vs PCB । नवी दिल्ली : आशिया चषकाच्या यजमानपदावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांच्यात वाद सुरू आहे. आयसीसीच्या नियोजित वेळापत्रकानुसार आशिया चषक 2023 ची स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी आधीच स्पष्ट केले आहे. यावर पीसीबीचे तत्कालीन अध्यक्ष रमीझ राजा यांनी भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. अशातच आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अधिकाऱ्याने एक मोठे विधान केले आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) महाव्यवस्थापक वसीम खान यांनी म्हटले आहे की, आशिया चषक 2023 च्या वादामुळे पाकिस्तान त्यांचे वन डे विश्वचषकातील सामने भारतात खेळेल असे वाटत नाही. खरं तर 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर यादरम्यान भारतात वन डे विश्वचषक पार पडणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे होणार असल्याची देखील चर्चा आहे.
ICC अधिकाऱ्याचं मोठं विधान "मला माहित नाही की भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकातील पाकिस्तानचे सामने इतर तटस्थ ठिकाणी खेळवले जातील की नाही. परंतु मला वाटत नाही की, पाकिस्तान त्यांचे सामने भारतात खेळेल. मला वाटते की त्यांचे सामने देखील भारताच्या आशिया कप सामन्यांप्रमाणेच तटस्थ ठिकाणी आयोजित करावे लागतील", असे आयसीसी अधिकारी वसीम खान यांनी एआरवाय न्यूजला सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"