नवी दिल्ली । इंग्लंड आणि भारत यांच्यामधील एकदिवसीय मालिका खूप चर्चेत आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून इंग्लिश संघाने मालिकेत बरोबरी साधली आहे. मात्र भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या खूप खराब फॉर्मचा सामना करत आहे. त्यामुळे भारतीय संघातील वाद चव्हाट्यावर येण्याची दाट शक्यता आहे. कारण अनेक माजी दिग्गज खेळाडूंनी कोहलीबाबत विधानं केली आहेत त्यामुळे एक वाद चिघळला आहे. दरम्यान याच वादामुळे कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला.
मागील ३ वर्षांपासून कोहलीला एकही शतकीय खेळी करता आली नाही. कोहलीच्या खेळीबद्दल सतत प्रश्न उपस्थित होत असतानाच गुरूवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माला पत्रकार परिषदेत याबाबत विचारणा केली असता त्याने उत्तर देण्याचं टाळलं. कारण कोहलीच्या फॉर्मवरील प्रश्नांचा सामना मोठ्या प्रमाणात रोहितला करावा लागत आहे. यादरम्यान रोहितने पत्रकाराला प्रश्न विचारण्यापासून मध्येच थांबवलं आणि मला याबाबत बोलायचं नसल्याचे संकेत दिले.
रोहितनं पत्रकाराला प्रश्न विचारण्यापासून रोखलं
पत्रकाराने विचारलं की, विराट कोहलीबाबत क्रिकेट वर्तुळात खूप चर्चा रंगली आहे. पत्रकाराचा प्रश्न पूर्ण न होताचं शर्माने त्याला रोखलं आणि "असं का होत आहे मित्रा? मलाच समजत नाही, चल विचार?" असं बोलून पत्रकाराला प्रश्न विचारण्यास सांगितलं. प्रश्न पूर्ण करताना पत्रकार म्हणाला, "कोहलीसारख्या प्रतिभावान खेळाडूला अशा कसोटीच्या काळात आश्वस्त केलं पाहिजे की त्याला त्याचा एकांत दिला पाहिजे?" यावर रोहितने शांतपणे उत्तर दिले.
कोहली एक महान फलंदाज - रोहित
पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना रोहित म्हणाला, "त्याने एवढी वर्षे सामने खेळले आहेत. तो एक महान फलंदाज आहे त्यामुळे त्याला आश्वासन देण्याची काही गरज नाही. मला वाटतं की मी मागच्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की फॉर्म खालीवर होऊ शकतो. तो एक खेळाचा भाग आहे सर्वच खेळाडूंना याचा सामना करावा लागतो. त्यामुळे एका खेळाडूचे संघासाठी काय योगदान आहे ते पाहावे एक-दोन खेळींमुळे त्याला डाग लागत नाही. मला पूर्ण विश्वास आहे की अन्य लोकं देखील हाच विचार करत असतील."
लॉर्ड्स येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने शानदार सुरूवात केली, मात्र त्याला मोठी धावसंख्या करण्यात अपयश आलं. केवळ १६ धावांवर कोहली बाद झाला त्याच्या या खेळीत एकूण ३ चौकारांचा समावेश आहे. त्याला इंग्लंडच्या डेव्हिड विलीने बाद केले.