पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद काही केल्या संपण्याचं नाव घेत नाही... भारताचा सलामीवीर क्रिकेटच्या मैदानावर सक्रीय असतानाही हे वाद सुरूच होते आणि आता राजकारणी झाल्यानंतरही सुरूच आहेत. गंभीर आणि पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी यांच्यात सातत्यानं वाद होता, आहे आणि राहिलही... सोशल मीडियावर या दोघांचे अनेकदा खटकेही उडालेले आहेत. यात आता नव्या पाकिस्तानी खेळाडूची भर पडली आहे. पाकच्या या खेळाडूनं तर आपल्यामुळे गंभीरची वन डे कारकीर्द संपुष्टात आणल्याचा अजब दावा केला आहे.
पाकिस्तानचा डावखुरा गोलंदाज मोहम्मद इरफानने हा दावा केला आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इरफानने हा अजब दावा केला आहे. 2012च्या द्विदेशीय वन डे मालिकेत इरफानने चारवेळा गंभीरला बाद केले. उंचीमुळे अनेक भारतीय फलंदाजांना त्याचा सामना करायला जमले नाही, असेही इरफान म्हणाला. इरफानची उंची 7 फुट 1 इंच इतकी आहे आणि 2010मध्ये त्यानं इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2012मध्ये झालेल्या वन डे आणि ट्वेंटी-20 मालिकेत इरफानने गंभीरला चार वेळा बाद केले. त्या मालिकेल गंभीर भारताकडून अखेरचा ट्वेंटी-20 सामना खेळला होता आणि 2013नंतर त्याला वन डे संघातूनही डच्चू देण्यात आला होता.
गौतम गंभीरने लगावला पाकिस्तानला टोला; काश्मीर आणि कराचीबाबत काय म्हणाला, पाहा व्हिडीओ...
गौतम गंभीरकडून शाहिद आफ्रिदीला 'गिफ्ट'; काश्मीर मुद्यावर म्हणाला...
इरफान म्हणाला,''भारतीय फलंदाज माझ्या गोलंदाजीचा सामना करताना अडखळत होते. माझ्या उंचीमुळे अनेक फलंदाजांना गोलंदाजीचा अंदाज बांधता येत नव्हता. गंभीर तर माझ्या गोलंदाजीचा सामना करणे टाळायचा. सराव सत्रात तो माझ्या नजरेला नजरही देत नव्हता. 2012च्या मालिकेत मी त्याला चारवेळा बाद केले होते. त्यानंतर गंभीरला संघातील स्थानही गमवावे लागले. गंभीरची कारकीर्द संपवली म्हणून अनेकांनी माझे अभिनंदनही केले.''