नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकातील भारत-पाकिस्तान हा बहुचर्चित सामना होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. 23 ऑक्टोबर रोजी रविवारी ही लढत होणार आहे. मागील टी-20 विश्वचषकात पाकिस्तानने भारतीय संघाचा दारूण पराभव केला होता. त्यामुळे आगामी सामन्यातून भारतीय संघ पराभवाचा वचपा काढणार का याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने मागील वर्षी यूएईमध्ये खेळवलेलेल्या टी-20 विश्वचषकाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यावेळी पाकिस्तानने भारतीय संघाचा 10 गडी राखून पराभव केला होता. मात्र या सामन्यात पाकिस्तानच्या हसन अलीची चांगलीच धुलाई झाली होती. याचीच आठवण पंतने सांगितली आहे.
पंतने दिला जुन्या आठवणींना उजाळा ऋषभ पंतने आयसीसीशी संवाद साधताना म्हटले, "मला आठवतंय की मी मागील वर्षी हसन अलीला एकाच षटकात सलग दोन षटकार मारले होते. आम्ही रनरेट वाढवण्याचा प्रयत्न करत होतो. आमच्या संघाचे लवकर फलंदाज बाद झाले होते आणि तेव्हा आम्ही एक भागीदारी नोंदवली होती. ही पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याची आठवण आहे, त्यामुळे आगामी पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यासाठी मी उत्सुक आहे", असे पंतने म्हटले.
पाकिस्तानविरूद्ध खेळणे नेहमीच खास असते. कारण त्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. फक्त आमच्याच नाही तर सर्व चाहत्यांच्या भावना यात गुंतलेल्या असतात. ज्यावेळी तुम्ही मैदानात उतरता तेव्हा एक वेगळीच भावना असते, वेगळ्या प्रकारचे वातावरण असते. जेव्हा देशाचे राष्ट्रगीत सुरू होते तेव्हा मनात अभिमानाची भावना तयार होते, असे रिषभ पंतने आयसीसीला दिलेल्या रिव्ह्यूमध्ये म्हटले.
विराट कोहलीकडून खूप शिकण्यासारखे आहे - पंत तसेच आक्रमक यष्टीरक्षक फलंदाज पंतने स्टार फलंदाज विराट कोहलीचेही कौतुक केले. ऋषभ म्हणाला, "विराट कोहली तुम्हाला अशा परिस्थितीतून बाहेर पडायला शिकवू शकतो, जे एखाद्या क्रिकेटरला त्याच्या करिअरमध्ये खूप मदतशीर असते. त्यामुळे त्याच्यासोबत फलंदाजी करणे केव्हाही चांगले असते. अनुभवी खेळाडूसह फलंदाजी करणे अधिक चांगले आहे कारण तो तुम्हाला खेळाचे नेतृत्व कसे करावे आणि चांगला रनरेट कायम कसा ठेवायचा हे शिकवतो." खरं तर रिषभ पंत सध्या त्याच्या जुन्या लयमध्ये नाही. मागील काही कालावधीपासून त्याने एकही मोठी खेळी केली नाही. अशा परिस्थितीत त्याला पाकिस्तानविरूद्धच्या सलामीच्या सामन्यात संधी मिळते का हे पाहण्याजोगे असेल. रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक या दोघांमधील एकाला संधी दिली जाईल. भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध रविवारी होणार आहे.
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू - श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई.
भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक23 ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न27 ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, 12.30 वाजल्यापासून, सिडनी30 ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, 4.30 वाजल्यापासून, पर्थ2 नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, 1.30 वाजल्यापासून, एडलेड6 नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न13 नोव्हेंबरला अंतिम सामना
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"