मुंबई : आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात भारताचा वेगावान गोलंदाज श्रीसंत दोषी आढळला होता. पण याप्रकरणी श्रीसंतने खळबळजनक खुलासा केला आहे. मी स्पॉट फिक्सिंग केलेच नाही, माझ्याकडून या साऱ्या गोष्टी वदवून घेतल्या गेल्या, असा आरोप श्रीसंतने केला आहे. श्रीसंतच्या या वक्तव्यामुळे या प्रकरणाला आता नवीन वळण मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.
स्पॉट फिक्सिंगचा आरोप श्रीसंतवर लावण्यात आला होता. दिल्ली पोलीसांनी त्याला मुंबईतून अटक केली होती. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये होते. त्यानंतर श्रीसंतवर आजीवन बंदी घालण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. यानंतर श्रीसंतवर आजीवन बंदी घालणे योग्य नसल्याचे म्हटले गेले होते.
याबाबत श्रीसंत म्हणाला की, " माझ्यावर आजीवन बंदी घालण्याचा आणि 10 लाख रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण मी स्पॉट फिक्सिंग केले याचा कोणताही पुरावा नव्हता. त्यामुळे माझ्यावर करण्यात आलेली कारवाई योग्य नाही."
श्रीसंतने काय केला खळबळजनक खुलासास्पॉट फिक्सिंगच्या आरोपांबाबत श्रीसंत म्हणाला की, " माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहे. जेव्हा या प्रकरणाची चौकशी सुरु होती. तेव्हा मला दिल्ली पोलीसांनी धमकी दिली होती. तुझ्यासह कुटुंबियांना आम्ही त्रास देऊ आणि त्यांचे शोषण करू, असे मला दिल्ली पोलीसांनी सांगितले होते. त्यामुळे मी स्पॉट फिक्सिंगचा आरोप दिल्ली पोलीसांच्या दबावाखाली येऊन मान्य केला होता."