नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्याचे संकेत दिले आहेत. अलीकडेच तिने ८ जून २०२२ रोजी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र महिला आयपीएलच्या पहिल्या हंगामासाठी संन्यास मागे घेणार असल्याचे तिने संकेत दिले आहेत. महिला आयपीएलमध्ये एकूण सहा संघाचा समावेश असू शकतो, ज्याचा थरार पुढील वर्षापासून सुरू होण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, मिताली राजने जूनमध्ये आपल्या राजीनाम्याची घोषणा केली होती. महिला आयपीएलच्या पहिल्या हंगामात सहभागी होण्यासाठी मिताली राजकडे सर्व पर्याय खुले आहेत. "मी त्या सर्व पर्यायांना खुले ठेवत आहे. मी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे. महिला आयपीएल होण्यासाठी आता फक्त काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. महिला आयपीएलच्या पहिल्या हंगामाचा हिस्सा होणे चांगले असेल", असे मितालीने आयसीसी १०० पर्सेंट क्रिकेट पॉडकास्टच्या पहिल्या एपिसोडमध्ये सांगितले.
जूनमध्ये दिला होता राजीनामा
शेफाली वर्माचे केले कौतुक अवघ्या १६ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मिताली राजची २३ वर्षांची मोठी क्रिकेट कारकिर्द राहिली आहे. मिताली राजने भारतीय संघाची सलामीवीर फलंदाज शेफाली वर्माच्या खेळीचे कौतुक केले. "मी तिची मोठी फॅन आहे, ती भारताची अशी एक खेळाडू आहे की तिच्यामध्ये कोणत्याही क्षणी सामन्याचा निकाल बदलण्याची क्षमता आहे. ती अशा खेळाडूंपैकी एक आहे, जे खेळाडू आपल्याला कदाचित एका पिढीत एकदाच पाहायला मिळतात."