नवी दिल्ली : यूएईच्या धरतीवर आशिया चषकाचा (Asia Cup 2022) थरार रंगला आहे. भारतीय संघाने सलग दोन सामने जिंकून सुपर-4 मध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) मोठ्या विश्रांतीनंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. कोहलीने स्पर्धेतील पहिल्या सामन्यात 35 धावांची खेळी केली तर हॉंगकॉंगविरूद्धच्या सामन्यात 59 धावांची खेळी केली होती. लक्षणीय बाब म्हणजे मोठ्या कालावधीनंतर किंग कोहलीने अर्धशतक झळकावले आहे. त्यामुळे आगामी टी-20 विश्वचषकासाठी कोहलीचा फॉर्म भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. अशातच ऑस्ट्रेलियाच्या संघाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिगने (Ricky Ponting) विराट कोहली टी-20 विश्वचषकात सर्वोत्तम कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
विराट कोहली सर्वोत्तम कामगिरी करेल
भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर आयसीसी रिव्ह्यूवर रिकी पॉंटिगने म्हटले, "विराटला धावा करताना पाहून मला खूप आनंद झाला. त्याने आव्हानाचा पाठलाग करताना धावा केल्या हे आश्चर्यकारक नव्हते. सर्वांना माहिती आहे की आव्हानाचा पाठलाग करताना त्याचा विक्रम सर्वोत्तम आहे. जेव्हा मी त्याची खेळी पाहिली आणि नुकतेच सोशल मीडियावर जे वाचले ते पाहिले तेव्हा असे वाटले की तो मानसिकदृष्ट्या खूप खचला होता. मात्र त्याने अलीकडेच काही गोष्टी शेअर केल्या आहेत, तेव्हापासून तो थोडा मोकळा वाटत आहे आणि त्याची विचारसरणी देखील सकारात्मक झाली आहे."
आशिया चषकातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये विराट कोहलीने शानदार खेळी केली आहे. 35 आणि 59 धावांची खेळी करून कोहलीने शानदार लय पकडली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर पार पडणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकात विराट कोहली सर्वोत्तम कामगिरी करेल असा विश्वास रिकी पॉंटिंगने व्यक्त केला आहे.
विराट कोहलीला इंग्लंडविरूद्धच्या मालिकेनंतर विश्रांती देण्यात आली होती. खराब फॉर्ममुळे अनेक दिग्गजांनी विराटला विश्रांती द्यायला हवी असे मत व्यक्त केले होते. तर काहींनी त्याच्यावर विविध स्तरातून टीका केली होती. मात्र आशिया चषकातील पहिल्या दोन्ही सामन्यात कोहलीने संयमी खेळी करून टीकाकारांना उत्तर दिले आहे. हॉंगकॉंगविरूद्धच्या सामन्यात गोलंदाजाच्या धीम्या गतीमुळे भारतीय फलंदाजांना धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागला. तरीदेखील अखेरच्या काही षटकांमध्ये कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रतिस्पर्धी संघासमोर 192 धावांचा डोंगर उभारला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने अवघ्या 26 चेंडूंत 6 चौकार आणि 6 षटकारांच्या जोरावर 68 धावांची अर्धशतकी खेळी केली होती.
Web Title: I hope Virat Kohli back at his best in T20 World Cup says that ricky ponting
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.