कसोटी संघाचा माजी उप कर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) याला अजूनही भारतीय संघात पुनरागमन करण्याचा विश्वास आहे. त्यासाठी तो आता रणजी करंडक स्पर्धेत मैदानावर उतरणार आहे. जानेवारी २०२१मध्ये ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर अजिंक्य रहाणे नायक बनला होता आणि त्याला कसोटी संघाचा नवा कर्णधार बनवण्याची मागणी झाली होती. पण, आता फेब्रुवारी २०२२मध्ये तो कामगिरीशी संघर्ष करताना दिसतोय आणि भारताच्या कसोटी संघातही स्थान गमावण्याची शक्यता आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवरील ऐतिहासिक शतकानंतर अजिंक्यला एकही शतक झळकावता आलेलं नाही. इंग्लंड दौऱ्यावरही त्याला अपयश आले, मायदेशातील न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही तो फार काही कमाल दाखवू शकला नाही.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर त्याला उप कर्णधारपदावरून हटवले गेल. त्यानं काही चांगल्या खेळी केल्या, परंतु मालिकेत छाप पाडू शकला नाही. त्यात आता श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत त्याला व चेतेश्वर पुजारा यांना संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. पण, अजिंक्य रणजी करंडक स्पर्धेत चांगली कामगिरी करून पुन्हा भारतीय संघात स्थान पटकावण्यासाठी सज्ज आहे. तसा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.
Backstage with Boria या कार्यक्रमात तो म्हणाला,'' लोकं जेव्हा म्हणतात की माझं करियर आता संपलं आहे, तेव्हा मी फक्त हसतो. ज्यांना हा खेळ कळतो ते अशा वायफळ चर्चा कधीच करत नाहीत. कसोटी क्रिकेटमधील माझं योगदान सर्वांना माहित आहे आणि जे या खेळावर प्रेम करतात ते समंजसपणेच बोलतात. मला माझ्या क्षमतेवर विश्वास आहे. मी चांगली फलंदाजी करू शकतो आणि अजूनही माझ्यात चांगले क्रिकेट शिल्लक आहे.''
मुंबईच्या रणजी संघात अजिंक्य, पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणारमुंबईचा रणजी संघ - पृथ्वी शॉ ( कर्णधार), अजिंक्य रहाणे, यशस्वी जैस्वाल, आकर्षित गोमेल, अरमान जाफर, सर्फराज खान, सचिन यादव, आदित्य तरे ( यष्टिरक्षक), हार्दिक तामोरे ( यष्टिरक्षक), शिवम दुबे, अमन खान, शाम्स मुलानी, तनुष कोटियान, प्रशांत सोलंकी, शशांक अत्तार्डे, धवल कुलकर्णी, मोहित अवस्थी, प्रिन्स बदियानी, सिद्धार्थ राऊत, रॉयस्टन डायस, अर्जुन तेंडुलकर.